
चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले आरोप…
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. आमचा पक्ष अशा खालच्या थराचे कृत्य करत नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासण्यात आल्याची घटना रविवारी अक्कलकोट येथे घडली. शिवधर्म फाऊंडेशनचे हे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांकडून निषेध व्यक्त होत आहे. तर प्रवीण गायकवाड यांनी म्हटले की फक्त काळे फासण्याचा त्यांचा हेतू नव्हता तर जीवे मारण्याचाच त्यांचा कट होता. आमच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेला हल्ला आणि यातील हल्लेखोर हे भाजपचे सक्रीय पदाधिकारी असल्याचा आरोप केला. हल्लेखोर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय आहे, असाही आरोप अंधारेंनी केला. तर महसुल मंत्री बावनकुळे यांनी अंधारे यांचे आरोप फेटाळले आहेत.
बावनकुळे म्हणाले, गायकवाड यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांनी चौकशी करावी. त्यात आमचा काही संबंध नाही. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हल्लेखोर कोणत्याही पक्षाचे असले तरी ते आरोपी आहे. कार्यकर्ते हे सर्व मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढत असतात. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असेही बावनकुळे म्हणाले.
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दिपक काटे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. भारतीय जनता पक्षाचा सक्रीय पदाधिकारी आहे. माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी त्याला एखादी आमदारकी/खासदारकी/ महामंडळ देऊनच टाका, भाजपाच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबरने पास झाला, असे टोला शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे.