
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…
मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येऊन नऊ दिवस लोटले आहेत. तरी, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही.
राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी अनौपचारिक बैठकीत ‘मराठीच्या समर्थनार्थ व्यासपाठीवर आम्ही एकत्र आलो होतो,’ असे राज ठाकरे यांनी सांगत युतीवर भाष्य करणे टाळले. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
अनौपचारिकपणे आम्ही सुद्धा अनेक गोष्टी बोलतो. औपचारिकपणे जे बोलायचे आहे, ते आम्ही लवकरच बोलू, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांच्या पक्षाचं तीन दिवसीय शिबिर आहे. राज ठाकरे यांनी कॅमेरासमोर वक्तव्य केले आहे का? अनौपचारिकपणे बोलले, असे पत्रकार सांगत आहेत. अनौपचारिकपणे आम्ही सुद्धा अनेक गोष्टी बोलतो. औपचारिकपणे जे बोलायचे आहे, ते आम्ही लवकरच बोलू. आता उगाचच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत. महाराष्ट्राच्या हिताचे जे करायचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निर्णय घेतील. पाऊस पडत नसताना गडगडाट करू नका. पाऊस आणि ढागांना वेगळी दिशा देण्याचे काम आम्ही करू.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी इगतपुरी येथे आहेत. तेथे दोन भावांच्या एकत्र येण्याविषयी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे चर्चा करण्याचे टाळले. ‘मराठीच्या समर्थनार्थ आम्ही एकत्र आलो होतो. मुंबईत झालेला मेळावा फक्त मराठी भाषेसाठी आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी होता,’ असे राज ठाकरेंनी सांगितलं.