
तुम्हाला मिरच्या का झोंबल्या ?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा हा वादळी ठरणार असल्याची चर्चा असताना मंगळवारी (15 जुलै) विधानसभेत याचा एक ट्रेलर पाहायला मिळाला. कारण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या उत्तर दिले.
पण त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. पण याला चोख उत्तर देत महायुतीचे आमदारांनीही त्याला प्रत्युत्तर केले. या गदारोळानंतर तालिका अध्यक्षांना विधानसभा 10 मिनिटांसाठी तहकूब करावी लागली. पण यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलेल्या आरोपांना शिंदेंच्या आमदारांनी आरोपांनीच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभेत लक्षवेधी दरम्यान आमदार वरूण सरदेसाई यांनी एक मुंबईतील वांद्रे परिसरातील एक मुद्दा मांडला. वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. पण त्यांनी दिलेल्या या उत्तरानंतर ठाकरे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “मला या विषयात आणखी खोलात जायचे नव्हते पण आता माझ्याकडे अर्धवट ब्रीफिंग आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, 2019 ते 2022 या वर्षांमध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नाही.” त्यांनी हे विधान करताच विधानसभेत मोठा गदारोळ झाला.
ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई ही चिडल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, “तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी कोणाचे सरकार होते? 2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमची लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा?” असे म्हणत आक्रमक झाले. “मी 2019 ते 2020 यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो. जर मी कोणाचे नाव घेतले नाही तर मग एवढ्या नाकाला मिरच्या का झोंबल्या? असा सवाल त्यांनी केला.
आमदार आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, “मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. चुकीची उत्तरे देत आहेत म्हणून हक्कभंग आणायचा का?” असा सवाल उपस्थित केला. तसेच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “कोणत्याही मंत्र्याला कोणत्याही खात्याबाबत बोलता येत नाही. सभागृहाच्या नियमानुसार तसे करायचे असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. शंभुराज देसाई नगरविकास खात्याच्या प्रश्नांवर कसे बोलू शकतात. ते मुख्यमंत्री आहेत का? त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले होते का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने तालिका अध्यक्षांनी विधानसभा 10 मिनिटे तहकूब केले.