
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत आहे. आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करीत आहेत.
मात्र, नाशिकच्या राजकीय वर्तुळातून भूवया उंचावणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही माजी नगरसेवकासह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतच भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मागील दोन – तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. हेमंत गोडसे यांच्यासोबत ५ ते ६ नगरसेवक देखील भाजपासोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो.
या चर्चांवर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा २ ते ३ दिवसांपासून सुरू असल्या तरी पण मी पक्षातच आहे’, असं गोडसे म्हणाले.
शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हे सलग दोन वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भूजबळ आणि २०१९ साली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता. नंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदेंची साथ दिली. २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा त्यांनी पराभव केला होता.
महायुती आणि महाआघाडीमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू जरी असलं तरी, महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत शह- शहकाटशहचे वातावरण रंगल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेकडून भाजप पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. सध्या प्रत्येक पक्षाला प्रभागरचनेची प्रतिक्षा आहे.