
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर.
( पुणे ) : अहिल्यानगर वरून पुण्याकडे येताना वाघोली पासून रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या परिसरातील नागरिकांच्या नशिबाला पूजलेली आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा व आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाची बोटचेपी भूमिका आणि नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या राजकीय अनास्थेमुळे वाघोली ते खराडी जकात नाका रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे.वाहनचालकांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. इंधन व वेळेचा अपव्यय होत असल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. उबाळेनगर ते खराडी जकात नाका मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.त्यामुळे वाहनचालकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या एक किलोमीटरच्या मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालली आहे. हा एक किलोमीटरचा रस्ता पास करण्यासाठी वाहचालकाला सुमारे पाऊणतास ते एक तास लागत आहे.
सकाळी कार्यालयीन कामकाजावेळी व सायंकाळी कार्यालये सुटल्यावर पुण्यात जाणारे कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात याच रस्त्यांवरून वाहतूक करत असल्याने सकाळी व विशेषतः सायंकाळी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांची सातत्याने वाहतूक,अर्धवट विकासकामे अशा अडथळ्यांच्या शर्यतीत दररोज सुमारे दीड लाख वाहनांची वर्दळ या रस्त्यावर सुरू असते.त्यामुळे वाहनांच्या गर्दीत परिसराचा श्वास कोंडल्यासारखी स्थिती आहे.
वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व पर्यायी उपाययोजना करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. जनता भरडून निघत असताना नेतेगिरी करत फिरणारे तसेच फुटकळ कारणांसाठीही आंदोलन करणारे स्वयंघोषित नेते कुठल्या बिळात लपून बसले आहेत? ते या समस्येवर आवाज का उठवत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.
वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. चौकाचौकात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याऐवजी ते ये-जा करणारे शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्य नागरिकांकडून पठाणी वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत असून वाहतूक विभागातील पोलिसांचे काम वाहतूक नियमन की वसुली असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.