
मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं…
केंद्रीय मंत्री रामदास यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेना सल्ला दिलाय. मराठी बोलला नाही म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करून चालणार नाही. जर मग येथे दादागिरी केली तर अन्य राज्यात मराठी लोक आहेत, त्यांचे काय?
असा सवाल करत दादागिरी करू नका, असे आवाहन रामदास आठवलेंनी केले आहे. जर दादागिरी करायची असेल तर राजसाहेबांनी मनसैनिकांना आर्मीत पाठवावे, असेही आठवले म्हणालेत. रामदास आठवले सांगलीच्या वाळवा येथे आयोजित पद्मभूषण डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात हिंदी सक्ती आणि मराठी भाषेवरून वाद सुरू आहे. राजकीय वर्तुळात मराठीचा मुद्द्यानं जोर धरलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे सेनेनंकडून हिंदी सक्तीवरून भाजपवर टीका केली जातेय. महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी बोललीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मनसेनं घेतलीय. जो मराठी बोलण्यास नकार देईल किंवा मराठी भाषेला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या कानाखाली जाळ काढला जाईल अशी भूमिका मनसेनं घेतलीय.
राज्य सरकारनं राज्यात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती केली होती. त्यावर अध्यादेश देखील काढला होता, परंतु राज्यातील मराठी जनतेचा रोष आणि ठाकरे बंधूंचा मोर्चाचा एल्गारामुळे सरकारला हिंदीचा शासन निर्णय मागे घ्यावा लागाल. त्यानंतर मनसेकडून मराठीचा मुद्दा उचलून धरण्यात आलाय.
मुंबईतील मीरा-भाईंदर येथे एका राजस्थानच्या मारवाडी व्यक्तीला मनसैनिकांनी मारहाण केली होती. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. जो मराठी आणि मराठी माणसाशी उद्धटपणे वागणाऱ्याला चोप दिला पाहिजे, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सुचक सल्ला दिलाय. केंद्रीय मंत्री रामदास यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना सल्ला देताना दादागिरी करून चालणार नसल्याचं म्हटलंय. दादागिरी करायची असेल तर राज साहेबांनी मनसैनिकांना आर्मीत पाठवा, असा सल्लाही रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला.