
कोकणातील शिवसैनिक मुंबईत प्रचारासाठी उतरणार; खेडमध्ये भाजपला घरघर…
मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर या महानगरपालिकांसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
इतकचं नाही तर ठाकरेंचे कोकणातील शिलेदार मुंबईत ठाकरेंच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी कल्याण पूर्वे येथील ठाकरे सेनेच्या संवाद बैठकीत निवडणुकीसाठी तयारीला लागल्याचेच संकेत दिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना बळ देण्याचं आवाहन करत मराठीच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे, भाजपवर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.
“एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे फोटो वापरतात”
एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे फोटो वापरतात, कारण त्यांच्याकडे स्वतःचे काही नाही. त्यामुळे आपण आपल्या पक्षावर लक्ष देऊया, असे आवाहन खेडेकर यांनी केले. ते म्हणाले, आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ द्या. शिंदे गटाचा खेळ चार दिवसांचा आहे. भाजप आपला राजकीय शत्रू आहे. असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मराठी माणूस जेव्हा एक झाला रस्त्यावर उतरला तेव्हा त्यांना कळलं की हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे. छत्रपतींचे मावळे सगळ्या धर्माचे विचारांचे होते. हे भाजपवाले फक्त निवडणुका आल्या की म्हणतात की मुस्लिम आमचे विरोधक आहेत. पण मुस्लिम आपले विरोधक नव्हते साबीर शेख यांच्यासारखे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या पक्षाचे मंत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे होते. गुजरातीदेखील आपले दुश्मन नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये राहून जर का आपल्यावर हिंदी लादत असतील तर ते सहन करू नका. असाही सज्जड इशारा या संवाद बैठकीत देण्यात आला.
खेड भाजपाला उद्धव ठाकरेंचा धक्का
यावेळी झालेल्या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भाजपाचे चंद्रकांत मोरे व रामचंद्र आखाडे हे उपस्थित होते लवकरच या भाजपाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होणार आहे. या संवाद बैठकीत चंद्रकांत मोरे यांनी उपस्थिती लावत खेडमधील भाजपावर जोरदार टीका केल्याने खळबळ उडाली आहे. तीन पक्षांचे तीन फोटो म्हणजे भाजपा असं म्हणत आपण या कार्यपद्धतीला कंटाळून आगामी काळात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनाच साथ देणार अजून लवकरच मोठा पक्षप्रवेश होईल असे जाहीर करून टाकल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भाजपही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झालं आहे.