चिकन मटण बंदीबाबत राज ठाकरेंनी मनपा; सरकारला सुनावले खडेबोल !
कल्याण डोंबिवलीच्या हद्दीतील कत्तलखाने 15 ऑगस्टला बंद ठेवण्याबरोबरच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला अनेकांकडून विरोध करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर त्या दिवीशी पार्टी करणार असल्याचे म्हणत महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणावरून आपले मत व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य म्हणता मग बंदी कसली आणता? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत सरकार आणि महापालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 14 ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या गोष्टीचे अधिकार नाहीत. कोणी काय खावे आणि कोणी काय खाऊ नये? हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत. एका बाजूला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला खायचे स्वातंत्र्य नाही. म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणत आहात. त्यामुळे यामध्ये हाच विरोधाभास आहे, असे मला वाटत असल्याचे यावेळी राज ठाकरेंनी म्हटले.
तसेच, आपण दोन गोष्टी पाळतो, असे सांगत राज ठाकरे म्हणाले की, एक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरा म्हणजे प्रजासत्ताक दिन. प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो. मग स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी कशी आणता? असा सवाल ठाकरेंकडून यावेळी उपस्थित करण्यात आला. तर कोणाचे काय धर्म आहे, कोणाचे काय सण आहेत, याच्याप्रमाणे कोणी काय खावे? ही गोष्ट मला वाटते की सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खावे आणि कोणी काय खाऊ नये. मी आता ऐकले की 1988 साली हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मला असे वाटते की, हा निर्णय 88 साली आणला असेल किंवा आता आणला असेल. पण कोणत्याही सरकारने याबाबतचा विचार केला पाहिजे की, स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. पण मग हा कोणता स्वातंत्र्य दिन? असाही जहरी सवाल यावेळी राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
