
महाराजांना धक्काबुक्की; वाहनाची तोडफोड अन् राजकीय धुरळा…
संगमनेरच्या घुलेवाडी इथं आयोजित अखंड हरिनाम सप्ताहमध्ये अभंगावर निरूपण करताना कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांनी राजकीय भाष्य करताना, हिंदू-मुस्लिमावर विधान केलं.
या निरूपणाला भर कीर्तनात विरोध केल्यानं गोंधळ उडाला. पुढं हा प्रकार वाढत जाऊन, महाराजांना धक्काबुक्की झाली.
वाढलेला गोंधळ पाहून महाराजांनी कीर्तनातून काढता पाय घेतला. त्यानंतर महाराजांच्या वाहनांची तोडफोड झाली. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी आठ ते दहा जणासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी या घटनेचा निषेध नोंदवत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता, निशाणा साधला आहे.
संगमनेर (Sangamner)शहरातील घुलेवाडी इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सप्ताहामध्ये शनिवारी रात्री संग्रामबापू भंडारे महाराज यांचे कीर्तन झालं. या कीर्तनात निरूपण करताना, महाराजांनी राजकीय भाष्य करताना, हिंदू-मुस्लिम, यावर भाष्य केले. यातून कीर्तनातील काहींनी अभंगावर निरूपण करा, इतर मुद्यांवर नको, अशी मागणी केली. त्यातून गोंधळ उडाला. यावरून हिंदुत्वावादी कार्यकर्ते आक्रमक झाले.
हिंदुत्ववादी (Hindu) कार्यकर्त्यांनी महाराजांची बाजू घेत, निरूपणाला भाष्य करणाऱ्यांना सुनावण्यास सुरवात केली. हा गोंधळ वाढल्याने महाराजांनी कीर्तन सोडलं. महाराज निघून जात असतानाच, त्यांना काहींनी धक्काबुक्की केली अन् पुढं महाराजांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद मिटला. परंतु सप्ताह ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात आठ जणांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अखंड हरिनाम सप्ताहामधील गोंधळावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. यापुढे महाराजांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही. नुसता प्रयत्न जरी झाला, तर महायुतीचे कार्यकर्ते हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त करतील, असा इशारा पत्रकार परिषद घेऊन दिला.
हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता टीका केली. माजी मंत्र्यांच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेचा निषेध करतो, असेही आमदार खताळ यांनी म्हटले.
अखंड हरिनाम सप्ताहात संग्रामबापू भंडारे महाराज यांनी अध्यात्माच्या माध्यमातून हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलताना अफजल खानाच्या नावाचा उल्लेख केला, त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिरची झोंबण्याचे काहीच कारण नव्हते, असेही आमदार खताळ यांनी म्हटले.
महाराजांवरील हल्ल्या संदर्भातील व्हिडिओ आपल्याकडे आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी. संगमनेरचे वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही, तर त्यांनी बदलील तयार राहावे, असा इशारा देखील आमदार खताळ यांनी दिला.