
उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना मदत करण्याबाबतमुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता, पण आम्ही त्यांना नकार कळवला आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
शुक्रवारी राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शरद पवार म्हणाले, “उपराष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार उभा केला आहे. त्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या. आम्ही सुदर्शन यांचे नाव निश्चित करून त्यांचा फॉर्मही भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. पण आम्ही फडणवीसांना सांगितलं की, राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत. आमच्याकडे मतांची संख्या कमी आहे. एनडीएकडे जास्त आहे, पण आम्हाला त्याची चिंता नाही. आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करून भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या येत्या निवडणुकीत एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोललो आणि त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली. उद्धव यांनी मला सांगितले की ते चर्चा करतील आणि मला कळवतील. शरद पवार यांनी मात्र त्यांना विरोधी पक्षाने उभे केलेल्या उमेदवारासोबत जावे लागेल, असे सांगितले.