
अचानक गायब झालेल्या तरुणाचा CCTV फुटेज पाहून पोलीसही थक्क…
सिंहगडावर फिरण्यासाठी गेलेला एक तरुण लघुशंकेसाठी गेला असताना अचानक गायब झाल्याची धक्कादायक घटना काल समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तो सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा परिसरात शेवटचा दिसला होता.
त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे तो या कड्यावरून घसरून दरीत पडल्याची भीती व्यक्त त्याच्या मित्रांनी व्यक्त केली होती. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली.
गौतम गायकवाड असं तरुणाचं नाव असून, तो मूळचा साताऱ्याच्या फलटण येथील आहे. तो आपल्या चार मित्रांसोबत हैदराबादहून पुणे आणि आसपासच्या ठिकाणी फिरण्यासाठी आला होता. दुपारच्या सुमारास चारही मित्र सिंहगडावर गेले होते. संध्याकाळी ते तानाजी कडा परिसरात फिरत होते. त्यावेळी गौतम लघुशंकेसाठी गेला असताना तो अचानक गायब झाला. यानंतर घाबरलेल्या मित्रांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याचा शोध सुरु केला. तसेच हा तरुण पाय घसरून दरीत कोसळल्याची शंका मित्रांनी व्यक्त केल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तरुणाचा शोध सुरु केला. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.
गौतम हा तानाजी कड्यावरून दरीत पडल्याचा दावा केला जात असतानाच, एका सीसीटीव्ही फुटेज मधून तो पळताना आणि लपताना दिसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आता या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला असून, गौतम सोबत नेमकं काय झालं असाव? याचा शोध घेत आहेत.