
उत्सवात डीजे नको; त्याऐवजी…
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश मंडळांना आवाहन केलं आहे की त्यांनी गणपतीच्या मिरवणुकांमध्ये डीजे वाजवू नये.
डीजीऐवजी बँड, ढोल-ताशा, बँजो मागवा असा सल्ला शिरसाट यांनी दिला आहे. तसेच, “पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे”, अशी मिश्कील टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दिसत होतं की संजय शिरसाट हे हॉटेलच्या एका खोलीमधील बेडवर बसून फोनवर बोलत आहेत आणि सिगारेट ओढत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या बेडच्या शेजारी एक बॅग देखील दिसत आहे. ही बॅग उघडी असून बॅगेत नोटांची बंडलं आहेत. या व्हिडीओत संजय शिरसाट यांचा पाळीव श्वान देखील दिसत आहे. संजय शिरसाटांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांमधील नेत्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. किमान या प्रकरणाची चौकशी तरी केली जावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.
या व्हिडीओवरून संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. मात्र, काही दिवसांनी हे प्रकरण शांत झालं. दरम्यान, यावरूनच शिरसाट यांनी रविवारी (२४ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना “माझी बॅग उघडीच आहे”, असं वक्तव्य केलं.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
संजय शिरसाट म्हणाले, “उत्सवाच्या काळात अनेकजण वाद सुरु झाला पाहिजे अशा मानसिकतेत आहेत. परंतु, मी सर्व गणेश मंडळांना व त्यांच्या अध्यक्षांना विनंती करतो की, डीजे नका वाजवू, त्याची काय गरज आहे? आपल्याला डीजे काय करायचाय? तुम्हाला हवा असल्यास चाळीसगावचा बँड मागवा ना, नाहीतर वैजापूरचा बेंजो मागवा. कुठलाही बँजो, बँड पथक किंवा ढोल ताशा पथख मागवा पण डीजे नको. पैसे कमी पडले तर हे सगळे लोक आहेतच”, असं म्हणत त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांकडे पाहिलं. त्यावर व्यासपीठावरील सर्व मान्यवर व उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पाठोपाठ शिरसाट म्हणाले, “काही झालं नाही तर मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे.” शिरसाटांच्या या मिश्कील टिप्पणीवर उपस्थितांनी आणखी जोरात हसून दाद दिली.