
प्रशासनात खळबळ…
कोल्हापूर : परमेश्वराचे बोलावणे आले, असे म्हणत रामपाल महाराज यांचे शिष्य असलेल्या २० भाविकांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. अथणी तालुक्यातील अनंतपूरसह पुणे व विजयपूर येथील भक्तांचा समावेश आहे.
भाविकांच्या म्हणण्यानुसार ८ सप्टेंबरला देहत्याग करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
देहत्याग करणाचा निर्णय घेणाऱ्यामध्ये मूळचे उत्तरप्रदेशचे असलेले पुण्यातील दहाजण तसेच अनंतपूर व विजयपूर येथील प्रत्येकी पाच व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण रामपाल महाराजांचे शिष्य असल्याचे संगितले जात आहे. दरम्यान यापूर्वी ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान अनंतपूर येथे विशेष महापूजा होणार आहे. या महापूजेचा समारोप देहार्पणाने केला जाणार आहे. हे सारे पाहण्यासाठी भक्तांचा मोठा समुदाय जमणार असल्याचे या भाविकांनी सांगितले.
एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश
कर्नाटक सीमेवरील अनंतपूर गावात शिंगणापूर रस्त्याला तुकाराम इरकर यांचे ५ सदस्यांचे कुटुंब आहे. या सर्वांनी रामपाल महाराजांकडून दीक्षा घेतली आहे. हे सर्वजण देहत्याग करणार आहेत. आता आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असून ८ सप्टेंबरला परमेश्वराचे बोलावणे आले आहे. या कुटुंबामध्ये तुकाराम इरकर यांचा मुलगा रमेश, पत्नी सावित्री, सून वैष्णवी व मुलगी माया शिंदे यांचा समावेश आहे.
महाराजांसाठी १४ हजाराची खास खुर्ची
६ सप्टेंबरला सकाळी महापूजेला सुरुवात होऊन ८ सप्टेंबरला देहासह वैकुंठी जाणार असल्याचे तुकाराम इरकर यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या महापूजेच्या सोहळ्यात तीर्थ देण्यासाठी रामपाल महाराज हे देखील येणार आहेत. यामुळे त्यांना बसण्यासाठी खास १४ हजार रुपये किंमत असलेली चांदीचा वर्ख असलेली खुर्ची आणण्यात आली आहे. या सोहळ्यात दर तासाला एकदा या खुर्चीला दंडवत घालून तीर्थ घेण्याच्या दिवसाची वाट पहात असल्याचे इरकर कुटुंबीय सांगत आहेत.
प्रशासनात खळबळ
२० जणांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान वैज्ञानिक युगामध्ये इरकर कुटुंबाची कृती मानसिक विकृती आहे. पोलिस खाते व आरोग्य खाते संयुक्तपणे इरकर कुटुंबाची चौकशी करणार असून त्यांना वैकुंठास जाण्याला मनाई करणार असून घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सिद्धराय भोसके यांनी सांगितले आहे.