
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील 48 तास प्रवास करून अखेर आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.
त्यांनी आझाद मैदानावर जाऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पण लाखो आंदोलक मुंबईत आल्यामुळे त्याच्या, राहण्याची, खाण्या-पिण्याची काहीच व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली नाही असा अरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?
रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल असे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.
‘सरकार मोठी चूक करत आहे’
या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!
जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर पूर्णपणे ठाम आहेत. मराठा समाज हा मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचला आहे. सकाळच्या वेळी मुंबईत अनेक भागात वाहतूककोडी झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर काही वाहाने ही रस्त्यावरच लावण्यात आली होती. यामुळे जरांगे पाटील यांनी लोकांना सांगितले की, आपली वाहने बाजूला काढा आणि मुंबईचे रस्ते रिकामे करा. पोलिसांना विचारा पार्किंग कुठे आहे, पोलिसांना सहकार्य करा.