
लवकरच बिहारच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या निवडणुकीला जिंकण्यासाठी भाजपा तसेच विरोधक कामाला लागले आहेत. काहीही झालं तरी यावेळची निवडणूक जिंकायचीच असा विचार सर्वच महत्त्वाच्या पक्षांकडून केला जात आहे.
दरम्यान आता भाजपा आणि नितीश कुमार यांना रोखण्यासाठी बिहारमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता बिहारमधील महागठबंधनची ताकद वाढणार असून भाजपा आणि नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
नेमका काय निर्णय झाला?
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या व्होटर अधिकार यात्रेनंतर बिहारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. या राज्यात विरोधकाांच्या महागठबंधनने भाजपा आणि नितीश कुमार यांना पराभूत करण्यासाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आता पशुपति पारस यांचा राष्ट्रीय लोकजन शक्ती पार्टी (रालोजपा) आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) या दोन पक्षांनी महागठबंधनमध्ये सामील होऊन निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित
शनिवारी (6 सप्टेंबर) बिहारमधील पाटणा शहरात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी महागठबंधनची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम, बिहार काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावारू, मुकेश साहन तसेच इतर अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत रालोजपा आणि जेएमएम हे महागठबंधनमध्ये सामील होऊन निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झाले.
तेजस्वी यादव यांनी दिले होते संकेत
काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांनी पशुपति पारस यांची भेट घेतली होती. राजोलपा आणि जेएमएम हे दोन्ही पक्ष लवकरच महागठबंधनमध्ये येतील याचेही संकेत तेजस्वी यादव यांनी दिले होते. त्यानंतर आता हे दोन्ही पक्ष महागठबंधनमध्ये सामील होऊन एकत्र निवडणूक लढवतील हे ठरवण्यात आले. याआधी राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेत पाटण्यामध्ये हेमंत सोरेन हेदेखील सामील झाले होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली होती.
दरम्यान, आता दोन महत्त्वाचे पक्ष महागठबंधनमध्ये आल्यामुळे नितीश कुमार तसेच भाजपापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.