
सी..पी.राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदी निवडून देण्यासाठी महाराष्ट्रातील 9 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून 4 किंवा 5 मते फुटतील असे गृहित धरले जात होते, मात्र प्रत्यक्षात 9 खासदारांनी सत्ताधार्यांच्या पारड्यात मत टाकले आहे.
मतदानाच्या दिवशी काल ता. 9 रोजी विरोधी पक्षांचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी.सुधाकर रेड्डी यांनी अंतरात्म्याला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले होते. हा आतला आवाज ऐकत महाराष्ट्रातल्या थेट 9 खासदारांनी रेड्डींऐवजी राधाकृष्णन यांना मत दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला स्वत:ची मते राखता आली नाहीत अशी टीका केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांनी संपर्कात असलेल्या विरोधी बाकावरच्या खासदारांनी मतदान करावे यासाठी लक्षपूर्वक कारवाई केल्याचे समजते. 15 मते फुटली अशी कबुली काँग्रेसनेते जयराम रमेश यांनी दिली आहे. या फुटलेल्या मतांत महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात होतेच, आता उबाठा या शिवसेनेतील ठाकरे गटाचे तब्बल 6, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 2, तर काँग्रेसचा एक जण आहे असे सांगितले जाते आहे.
या निवडणुकीत एनडीएने नेमलेल्या तीन निरीक्षकांत डॉ. श्रीकांत शिंदे या शिवसेना शिंदे गटाच्या खासदाराचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा समावेश केला गेला होता . त्यांनी मते फुटल्याचा दावा केला आहेच.त्यांना निरिक्षक नेमण्याचे कारण व्यूहरचनेकडे लक्ष देणे होते . शिवसेना उबाठाचे बृहन्मुंबईपरिसरातले एक , विदर्भातील दोन ,उत्तर महाराष्ट्र परिसरातील एक अशी चार मते फुटल्याचे सांगितले जाते आहे ,मात्र हा आकडा वाढला असून मराठवाडयातील दोन मते यात नंतर जमा झाल्याचे सांगितले जाते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे फुटलेले मत मुंबई परिसरातील आहे तर काँग्रेसच्या एका बडया नेत्याच्या जवळच्या खासदाराच्या अंतरात्म्याचा आवाज मोदीभक्तीचा झाला अशी कहाणीही चर्चेत आहे दिवाळीनंतर उबाठाचे आमदार फुटतील असे शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी सांगितले होते. त्यामुळे खरेच सहा मते फुटली का याबद्दलची कुजबूज वाढली आहे .शिवसेना उबाठाने हा अपप्रचार असल्याचे सांगत शिंदेसेनेवर बुध्दीभेदाचा जोरदार आरोप केला आहे.
ही तर केवळ तडफड : अरविंद सावंत
मात्र शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी हे आरोप फेटाळले आहेत. चिन्ह चोरले, नाव चोरले तरी उद्धवजींच्या मागे 11 खासदार आहेत. त्यांनी सर्वांनी इंडिया आघाडीला मतदान केले. उद्या फुटलेल्या 15 मतांत आम्ही सर्व 11 जण होतो म्हणतील. काहीही बोलण्याचा हा प्रकार शिंदेगटाची तडफड आहे, असा आरोप पुढारीशी बोलताना त्यांनी केला.