
मंत्री पंकजा मुंडे मराठ्यांच्या विरोधात दूषित रान पेटवतील, डिवचतील असे वाटत नाही. ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आमच्या दाखल्याला बोगस म्हणत असतील तर बीडमधील प्रत्येक मराठ्यांना विचार करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी आज (दि.११) पत्रकार परिषदेत दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात जरांगे म्हणाले की, आरक्षण प्रक्रियेबाबत सरकारच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत हैदराबाद गॅझेट कधीपासून सुरू होते, याची आम्ही वाट पाहतो आहोत. शब्दांमध्ये दुरुस्ती करु, असे सरकारने म्हटले आहे. काही जिल्ह्यांत सर्व अधिकारी चांगले काम करत आहेत. मात्र अनेक जिल्ह्यात अधिकारी अजिबात काम करत नाहीत. जे अधिकारी काम करणार नाहीत, त्यांना बडतर्फ करण्यात येईल.
छगन भुजबळांवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्यांवर त्यांनी संताप व्यक्त करत इशारा दिला की, येवल्याच्या भुजबळांनी जर शब्दांत फेरफार केला, तर त्यांचे राजकीय अस्तित्व संपेल. त्यांनी ‘मराठा’ शब्दावर आक्षेप घेतला, तर आम्ही 16 टक्क्यांवर आक्षेप घेऊ. 1994 मधील जीआर कसा काढला? जातीची संख्या एवढी नसताना आरक्षण कसे दिले? श्वेतपत्रिका काढा, असे आव्हान देऊन भुजबळांमुळे ही लढाई टोकाची होईल. खेटायचं असेल तर होऊन जाऊ द्या. आम्हीही तशी तयारी केली आहे.
1994 चे आरक्षण हे फक्त एका जीआरवर टिकून आहे. ते एका झटक्यात बाद होऊ शकते. त्यामुळे मराठ्यांना आता लढा द्यावा लागेल. मंडल आयोगाने 14 टक्के आरक्षण दिलं असताना काही समाज 30 टक्के खात आहे, असा दावा त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. त्यांनी सर्वांना सारखं तोललं पाहिजे, असे जरांगे म्हणाले.