
जाणून घ्या नेमकं कारण…
आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अद्याप विकली गेलेली नाहीत. हा सामना १४ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. सहसा या हाय-व्होल्टेज सामन्याची तिकिटे काही तासांतच संपतात, परंतु यावेळी मात्र तसे झालेले नाही.
याला कारण यावेळीची पॅकेज सिस्टीम ठरली आहे. त्यामुळे तिकिटांची किंमत २.५ लाख रुपयांपर्यंत वाढली. परिणामी तिकिटांची मागणी मंदावली आहे.
मंगळवारी (दि. ९) दुबईमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, जिथे आयोजकांनी विशेषतः भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांना स्वतंत्रपणे बसवले होते. अफगाणिस्तानचा राशिद खान मध्यभागी बसला होता. सूर्यकुमार यादव म्हणाला की आक्रमक खेळ विजयाची गुरुकिल्ली आहे, तर सलमान आगा शांत स्वरात म्हणाला की तो खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो.
भारतीय संघाकडे सर्वाधिक आशिया कप जिंकण्याचा विक्रम आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या १६ आशिया कपपैकी १५ मध्ये भाग घेतला आणि आठ वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारताने ही स्पर्धा सात वेळा एकदिवसीय स्वरूपात आणि एक वेळा टी-२० स्वरूपात जिंकली आहे. श्रीलंका सहा जेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे (पाच एकदिवसीय + एक टी-२०). पाकिस्तान दोनदा (दोन्ही एकदिवसीय) विजेता बनला आहे.
तिकीट पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पॅकेजची किंमत दोन जागांसाठी सुमारे २.५७ लाख रुपये आहे, ज्यामध्ये बसण्याची व्यवस्था, अमर्यादित अन्न आणि पेये, पार्किंग पास, व्हीआयपी क्लब/लाउंज, खाजगी प्रवेशद्वार आणि विश्रांती कक्ष यासारख्या सुविधांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे रॉयल बॉक्स २.३० लाख, स्काय बॉक्स ईस्ट १.६७ लाख, प्लॅटिनम ७५ हजार, ग्रँड लाउंज ४१ हजार, पॅव्हेलियन वेस्ट २८ हजार आणि सर्वात स्वस्त जनरल ईस्ट देखील दोन जागांसाठी सुमारे १० हजार रुपये आहे. त्यामुळे चाहत्यांना तिकीटे खरेदी करणे महाग होत आहे.
एका सामन्यासाठी विकत घ्यावी लागताहेत सात तिकीटे…
पॅकेज सिस्टम यावेळी आयोजकांनी तिकीट प्रणालीत बदल करून पॅकेज प्रणाली सुरू केली आहे. पूर्वी चाहते भारत-पाकिस्तान सामन्यासाठी थेट तिकिटे खरेदी करू शकत होते, परंतु यावेळी त्यांना संपूर्ण गट-स्टेज पॅकेज खरेदी करावे लागेल. याचा अर्थ असा की भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांना एकूण सात सामन्यांची तिकिटे खरेदी करावी लागतील.
अशा परिस्थितीत, ज्या चाहत्यांना फक्त भारत-पाकिस्तान सामना पहायचा आहे त्यांना उर्वरित गट सामन्यांसाठी देखील पैसे द्यावे लागतील. तथापि, यामध्ये सुपर-फोर आणि अंतिम सामन्यांचा समावेश नाही.
विमान प्रवास आणि हॉटेल्स महाग….
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान तिकिटांच्या किमतीतही वाढ झाली आहे. १३ आणि १४ सप्टेंबरच्या आसपासच्या विमानांची मागणी इतकी वाढली आहे की, भाडे दुप्पट झाले आहे. मुंबई ते दुबई या विमानाचे भाडे ११ हजार रुपयांपासून सुरू होते. दिल्ली ते दुबई या विमानाचे तिकीट सुमारे १५ हजारापर्यंत पोहोचले आहे. सामना जवळ येताच परतीच्या विमानाच्या तिकिटाची किंमत २५ हजार ते ४० हजारापर्यंत पोहोचू शकते.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी हॉटेल्सची परिस्थितीही वेगळी नाही. बजेट हॉटेल्स प्रति रात्री पाच हजारामध्ये उपलब्ध आहेत. थ्री ते फोर स्टार हॉटेल्स नऊ ते १२ हजारादरम्यान आहेत. फाईव्ह स्टार लक्झरी हॉटेल्स १८ हजारापर्यंत जात आहेत.