
हैदराबाद गॅझेटियरमधील ‘ती’ नोंद सांगत केली नवी मागणी !
बीड: मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता विविध समाजांकडून आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.
ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती असा उल्लेख असल्याचा दावा केला आहे. या मागणीला पाठिंबा देत आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा मिळावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधत सरकारची कोंडी केली आहे.
धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “हैदराबाद गॅझेटियर 1920 मध्ये स्पष्टपणे बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करण्यात आल्याची नोंद आहे. ऐतिहासिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या हा समाज वंचित, शोषित आणि मागासलेला आहे. आजतागायत या समाजाला न्याय मिळालेला नाही. अनेक वर्षांपासून बंजारा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करत आहे. त्यामुळे सरकारने 1920 च्या हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा ठोस निर्णय घ्यावा,” अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. तसंच बंजारा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, कारण इतिहासात नोंदी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले, तर शिक्षण, नोकरी आणि राजकारण या सर्वच क्षेत्रात बंजारा बांधवांना समान संधी मिळेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…
महोदय, मराठवाडा हा प्रदेश सन 1948 पर्यंत निजाम शासित हैद्राबाद संस्थानचा भाग होता, त्या काळातील हैद्राबाद गॅझेटियर 1920 मध्ये लांबडा/बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्याचे आढळून आले आहे. बंजारा (लमाण) समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे.
वरील पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या व प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये असल्याचे नोंदीनुसार स्पष्ट होते. तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर सन 1956 नंतर या समाजाला ओबीसी/एनटीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा देण्यात आला आहे.
राज्य शासनाने मराठा समाज बांधवांना दि.02.09. 2025 च्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅझेटियर लागू केले. शासन स्तरावर हैद्राबाद गॅझेटियर अधिकृतपणे स्वीकारले व अंमलात आले असल्यामुळे त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात सामील करून त्यांना या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्याची समाजाची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून बंजारा (लमाण) समाजास अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत सुयोग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती.