
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : शिरूर तालुक्यातील शहरी वा ग्रामीण भाग सर्वत्र पाणी साचलं आहे. जोरदार पाऊस कोसळल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिकांच्या घरात, व्यापा-यांच्या दुकानात पाणी शिरलं.शेतक-यांची अवस्थाही बिकट झाली तर वाहतुकीसाठी रस्ते ही बंद झाले.
काही दिवस उघडीप घेतलेला पाऊस पुन्हा कोसळू लागला. पावसाचा सर्वत्र धिंगाणा सुरू झाला अन् अनेकांच्या मनात भीती दाटली. नदीनाले तुडुंब भरले, वाहू लागले. हे पाणी रस्त्यावर, शेतात वाट मिळेल तिथे वाहत गेलं, साचत गेलं. पुणे जिल्ह्यातही हीच परिस्थिती असून येथे सुद्धा कुणाच्या घरात पाणी साचलं तर कुणाच्या घरातलं साहित्य वाहून गेलं.
उरळगाव ( ता. शिरूर ) येथील भाऊसाहेब वायदंडे यांचं कुटुंब असून हातावर पोट असणारे कुटुंब पैपै जमा करून उभा केलेला संसार अवघ्या काही मिनिटांमध्ये आलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेला. हे संकट पाहून त्यांच्या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. सरकार मदत देईल, हीच अपेक्षा ते व्यक्त करतायत. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरलं, रस्त्यावर साचलेल्या पाण्यानं वाहनचालकांना धडकी भरली, गाडी बंद तर पडणार नाही ना हीच भीती त्यांना होती. महामार्ग बंद झाल्यानं गावांचाही संपर्क तुटला. शेतात डोळ्यांदेखत चिखल होत होता. जमीन खरडून गेली.. हे नुकसान कसं भरून काढायचं, हाच प्रश्न शेतक-यांना भेडसावतोय.संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं आहे
शासनाने ताबडतोब मदत द्यावी..
शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब मदत करावी. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तातडीची आर्थिक मदत त्या त्या कुटुंबाला देण्यात यावी. अशी मागणी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष,खरेदी विक्री संघाचे संचालक नामदेवराव गिरमकर यांनी शासनाकडे केली आहे