
टीका होताच स्पष्ट केली भूमिका; मेहता सिब्बलही मदतीला…
मध्य प्रदेशातील खजुराहो येथील भगवान विष्णू मुर्तीविषयी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला असून सोशल मीडियातून टीका होत आहे
हा वाद कानावर आल्यानंतर सरन्यायाधीशांनी गुरूवारी आपली भूमिका स्पष्ट केली. मातब्बर वकीलही त्यांच्या मदतीला धावून आले.
काय आहे प्रकरण?
खजुराहो येथील जवारी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंचीची भग्नावस्थेतील मूर्ती आहे. ही मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नकार दिला होता.
हा विषय कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात नसून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडील असल्याचे सांगतानाच त्यांनी एक टिप्पणी केली. आता तुम्ही देवाकडेच प्रार्थना करा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, असे म्हणता, तर मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा, असे विधान सरन्यायाधीशांनी केले होते. तसेच ही याचिकाही फेटाळून लावली होती.
सरन्यायाधीशांच्या या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार यांनी न्यायालयात बोलताना संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच काही वकिलांनी सरन्यायाधीशांना खुले पत्र लिहीत त्यांच्या विधानावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. अनेक विष्णू भक्तांनीही विधान मागे घेण्याची मागणी सरन्यायाधीश गवई यांच्याकडे केली.
वाद निर्माण झाल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी त्यादिवशी केलेले विधान चुकीच्या पध्दतीने सोशल मीडियात मांडण्यात आल्याचे कोणीतरी मला सांगितले. मी सर्व धर्मांचा आदर करतो. आपले विधान हे भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या अखत्यारीतील मंदिराशी संबंधित होते, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीशांच्या भूमिकेचे समर्थन केले. मी सरन्यायाधीशांना 10 वर्षांपासून ओळखतो, असे सांगत मेहता यांनी सोशल मीडियातून होत असलेल्या टीकेवरही टिप्पणी केली. सोशल मीडियात अनुचित प्रतिक्रिया दिसत आहेत. सरन्यायाधीश सर्व धर्मांशी संबंधित ठिकाणांवर जातात, असेही मेहतांनी सांगितले. ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश गवई यांची पाठराखण करताना सोशल मीडियातील टीकेवर निशाणा साधला. ‘सोशल मीडिया म्हणजे बेलगाम घोडा बनला आहे. त्याचे परिणाम आपण दररोज सहन करत असतो,’ असे सिब्बल म्हणाले.