
‘चांगला नेता म्हणून भविष्यात तुम्हाला मोठी संधी; पण…
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली. त्यावरून राज्यभरात गदारोळ उडाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्या वादावर आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले असून पवारांचा फोन आल्याचे सांगताना ‘आपण बोलताना त्याचे काय अर्थ निघतात, त्याचा विचार केला पाहिजे,’ असा सल्ला पडळकरांना दिल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जे विधान केले, ते योग्य आहे, असं माझं मत नाही. कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे, हे योग्य नाही. त्यासंदर्भात मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबतही बोललो आहे. त्यांनाही मी सांगितलेले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही मला फोन आला हेाता. तेही माझ्यासोबत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या विधानासंदर्भात बोलले. त्यांनाही मी सांगितले की, ‘गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही’ असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गोपीचंद पडळकर हे तरुण नेते आहेत, ते अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत. अनेकदा ॲग्रेशन दाखवताना आपल्या बोलण्याचा काय अर्थ निघेल, हे ते लक्षात घेत नाहीत. म्हणून त्यांना मी हे सांगितले आहे की, तुम्ही हे सर्व लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवले पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील, याचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही मी गोपीचंद पडळकर यांना दिला, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?
आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली होती. पडळकर यांनी एकेरी भाषेत ‘जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाहीत’ असे विधान केले होते.
राष्ट्रवादीची टिका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘भाजपच्या कोणत्या संस्कृतीत ही भाषा बसते,’ असा सवाल उपस्थित केला होता. भाजपने त्या विधानाबाबत तत्काळी माफी मागावी, अशी मागणीही आव्हाड यांनी केली होती.