
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 15 दिवसांत घेणार मोठा निर्णय…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पदभार स्वीकारून अडीच महिने झाले आहेत. मात्र, त्यानंतरही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्षावरील गारुड कायम आहे. बावनकुळे यांच्या काळात नेमण्यात आलेल्या कार्यकारणीसोबत ते काम करीत असल्याने त्याचा परिणाम जाणवत आहे.
चव्हाण यांना येत्या काळात नवीन कार्यकारिणी नियुक्त करायची आहे. त्यासाठी प्रत्येक विभागातून त्याच उद्देशाने नावे मागविण्यात आली आहेत. त्यामुळे ही नावे मिळताच येत्या पंधरा दिवसाच्या काळात प्रदेश भाजपची नवी कार्यकारिणी अस्त्तित्वात येणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने रवींद्र चव्हाण यांना मनाप्रमाणे काम करणे सोपे जाणार आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळयांसमोर ठेवून गेल्या सहा महिन्यात काँग्रेस, भाजप (BJP) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपकडून गेल्या अनेक दिवसापासून संघटनात्मक निवडणुका पार पडल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे रवींद्र चव्हाण यांनी हाती घेतली आहेत. त्यांनी पदभार स्वीकारून अडीच ते तीन महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र, त्यांच्या मनाप्रमाणे कामी करताना अडचणी येत आहेत.
त्यामुळेच आता प्रदेश कार्यकारिणीसाठी राज्यातील प्रत्येक विभागातून नावे मागवली आहेत. येत्या पंधरा दिवसात प्रदेश भाजपचे नवीन कार्यकारिणी झाल्यानंतर रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) मांडपक्की करतील असे दिसते. तीन महिन्यापूर्वी जरी चंदरशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, या पदावरून बावनकुळे अजूनही मनाने मोकळे झाले नाहीत. गेली अनेक वर्ष त्यांनी या पदावर काम केले आहे त्यामुळे साहजिक ही आहे. त्यांनीच वाढवलेल्या झाडाच्या सावलीकडे राहणे कोणालाही पसंत पडते. त्यामुळेच भाजपमध्ये रवींद्र चव्हाण मात्र अजूनही अडचणीतच दिसत आहेत.
प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे चव्हाण यांनी जरी हाती घेतली असली तरी कार्यकारिणीवर बावनकुळे यांचे वर्चस्व अद्याप दिसून येते. त्याचमुळे आता येत्या काळात नवी कार्यकारिणी निवडली जाणार आहे. त्यासाठी सर्वच जिल्ह्यातून नावे मागवली आहेत. ही नावे आल्यानंतर नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये चव्हाण समर्थक मंडळी राहणार असल्याने येत्या काळात काम करताना अडचणी येणार नाहीत.
येत्या चार महिन्याच्या कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती व महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. भाजपने देखील जोमाने तयारी सुरु केली आहे.
रवींद्र चव्हाणांपुढे आव्हानांची शर्यत
नव्या कार्यकारिणीशिवाय प्रदेशाध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी आणि पक्षाचे कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यांना त्यांच्याच टीमसोबत काम करण्याची संधी मिळत नाही. यामुळे, बावनकुळेंच्या टीमसोबत काम करत असताना त्यांना अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी विचार करावा लागत आहे. हीच स्थिती “अडथळ्यांची शर्यत” म्हणून पाहिली जात आहे.
लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा
पक्षश्रेष्ठींकडून लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या कार्यकारिणीत फडणवीस आणि चव्हाण यांच्या सहमतीनेच निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जाते. नव्या कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतरच रवींद्र चव्हाण खऱ्या अर्थाने भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली ‘छाप’ पाडू शकतील, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.