
त्यांनी पातळी सोडली नाही पाहिजे…
लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असला तरी इतरांनाही भावना आहेत, त्यांच्या भावना लक्षात ठेऊन आपण पातळी न सोडता आपली भूमिका योग्यरितीने मांडली पाहिजे. यामध्ये त्यांनी माफी न मागण्याने काही फरक पडत नाही, या गोष्टीला मी महत्व देत नाही. पण, माणसाचं मन दुखावण्याचं काम, व्यक्तिगत चारित्र्यहनन करण्याचं काम करू नये, असा सल्ला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांना दिला.
खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पडळकर यांना माणसाचं मन दुखावण्याचं काम करू नये, असा सल्ला दिला. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जे काही ठिकाणी सुरू आहे, ज्यापद्धतीने काही नेते हे अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका करत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीकाटिप्पणी करण्याचा अधिकार आहे, त्यात तक्रार नाही. सरकारच्या विरोधात किंवा समर्थनात आपण बोलू शकतो. मात्र व्यक्तिगत टीका करणे, हे अतिशय अशोभनीय आहे.
ते म्हणाले, बंजारा आरक्षणाबाबत राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चांगली कल्पना आहे. त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, त्यामध्ये बंजारा समाज हा VJNT मध्ये आहे. त्यांना दोन ते तीन टक्के ऑलरेडी आरक्षण दिलेले आहे. त्यांच्या मागणीनुसार हेच आरक्षण एसटीच्या कोट्यामधून मिळावं.
परवा जो शासन निर्णय झाला आहे, त्यानुसार इतरांना न अडचण होता, तो निर्णय काढण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की इतरांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही त्यातील महत्त्वाची बाब आहे. मुख्यमंत्री स्तरावर बंजारा समाजाच्या प्रश्नाची दखल घेतली जाईल. महाराष्ट्रात कोणतेही जातीय ध्रुवीकरण होऊ नये, सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या व्होट चोरीवर अशोक चव्हाण म्हणाले, आरोप करणे सोपे आहे. मात्र, ते सिद्ध करावे लागतात. सिद्ध केल्यानंतर त्या आरोपाला अर्थ असतो. निवडणूक आयोग हे संविधानानुसार स्वायत्त संस्था आहे, त्यावर आरोप करून बदनामी करणं, हे कितपत योग्य आहे. मागे सुप्रीम कोर्टाने यावर स्टेटमेंट दिलेले आहे, असं असताना अशा प्रकारचा आरोप करणं हे उचित नाही.
ओबीसी-मराठा वादावर ते म्हणाले, माझी सर्वांना विनंती एवढीच आहे, यातून काहीच साध्य होणार नाही. सामाजिक सलोखा कायम ठेवावा, राजकीय भूमिका सभागृहात मांडा आणि कायदेशीर मार्गाने त्यातून मार्ग काढावा
चव्हाण म्हणाले, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत नुकसान झालेले आहे, त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे. या सर्वांचे अहवाल सरकारकडे नुकतेच प्राप्त झालेले आहेत. कालच नांदेडला पहिली 532 कोटींची इंस्टॉलमेंट देण्यात आलेली आहे. इतरात्र सुद्धा ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना कशी मदत देता येईल, यासाठी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.
हवामान बदलाचा फटका हा सर्वत्र झालेला आहे. अतिवृष्टी ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. अगोदर पाचच मिलिमीटर पाऊस झाला, तर समजायचो मात्र आता एका दिवसात 100 मिलिमीटर पाऊस पडतोय. उत्तर भारतातही अशा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. ही नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही मात्र याची तीव्रता कशी कमी करता येईल यासाठी, आपणाला प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.