
MEA ची पहिली प्रतिक्रिया आली…
पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी संरक्षणविषयक एक महत्त्वाचा करार केला आहे. त्याद्वारे एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील आक्रमण मानले जाईल, असे या करारात नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी या करारावर स्वाक्षरी केली, अशी माहिती संयुक्त निवेदनात देण्यात आली. यानंतर आता यामध्ये कतार आणि संयुक्त अरब अमिराती हे देश सामील होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेतली. भारत-अमेरिका व्यापार चर्चा, दहशतवाद आणि पाकिस्तान, भारत-सौदी अरेबिया भागीदारी, चाबहार बंदर निर्बंध सवलत आणि इतर प्रादेशिक घडामोडींसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट करण्यात आली. मंत्रालयाने म्हटले आहे की, संपूर्ण जगाला दहशतवादी, पाकिस्तान आणि त्याचे सैन्य यांच्यातील संबंधांची चांगली जाणीव आहे. यासंदर्भातील त्यांची विधाने ही वस्तुस्थिती आणखी स्पष्ट करतात.
अलीकडच्या काळात भारत आणि सौदी अरेबियामधील धोरणात्मक भागीदारी लक्षणीयरीत्या मजबूत झाली आहे. परस्पर हितसंबंध आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन ही भागीदारी प्रगती करेल. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील संरक्षण कराराबद्दल भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या भागीदारांसोबत परस्पर हितांना प्राधान्य देते, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अमेरिकेने चाबहार बंदराबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत या निर्णयाचे परिणाम काय होतील, याचा आढावा घेत आहे. भारताच्या प्रादेशिक संपर्क आणि व्यापारासाठी चाबहार बंदर महत्त्वाचे आहे. कतार आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) सोबतच्या संबंधांबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या देशांशी भारताचे संबंध व्यापक आणि मजबूत आहेत. सौदी-पाकिस्तान संरक्षण करारात कतार आणि यूएईच्या संभाव्य सहभागाबद्दल भारताने सांगितले की, ते या देशांशी सतत संपर्कात आहे.