
बेलगाम गोपीचंद पडळकरांवरून अंजली दमानिया फडणवीसांवर बरसल्या…
जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विकृत पातळीवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत पडळकर यांच्या प्रवृत्तीवरून सुनावल होतं.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पडळकर यांना समज दिली होती. मात्र फक्त समज देण्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
अशा लोकांची गरज फडणवीसांना का भासते?
त्यांनी ट्विट करत म्हणाल्या की, फडणवीसांनी पडळकरला समज दिली? फक्त समज? अशा लोकांची गरज फडणवीसांना का भासते? अशी असभ्य माणसे त्यांना का लागतात? का त्यांना काढून टाकता येत नाही? काय value addition करतात पडळकर? दुसरीकडे, भाजपचे बेलगाम आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अत्यंत विकृत दर्जाच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अत्यंत हीन पातळीवरील टीकेनंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज (20 सप्टेंबर) सांगलीमध्ये ईश्वरपूरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. आष्टा शहरातही बंद पुकारण्यात आला आहे. काल (19 सप्टेंबर) सुद्धा आंदोलने करण्यात आली. मात्र, गोपीचंद पडळकर यांच्याकडून होत असलेल्या बेताल वक्तव्यानंतरही भाजपकडून आतापर्यंत त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर यांनी विशेषतः पवार कुटुंबीयांविरोधात अत्यंत हीन पातळीवर टीका केली आहे. त्यांच्या भाषेचा स्तर पाहून संतापाची लाट सर्वत्र उसळली आहे. दुसरीकडे चौफेर टीका होत असतानाही गोपीचंद पडळकर यांची मात्र मग्रुरी कमी झालेली नाही. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.