
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
जालना
(मंठा )तालुक्यासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विविध पिके तसेच शेतीमाल पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेश गणगे यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापूस, मूग, तूर या हंगामी पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांची कसोटी पाहण्याऐवजी शासनाने तत्काळ पुढाकार घेऊन “सरसकट मदत” जाहीर करावी, असे गणगे पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकरी सुखी राहिला तरच देश व राज्याची अर्थव्यवस्था सक्षम राहते. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्याला थेट मदत मिळेल, अशी पारदर्शक यंत्रणा उभारावी.
युवा सेना उपजिल्हाप्रमुख गणगे पाटील यांनी इशारा दिला की, शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारले जाईल.