
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंतराव पाटील यांच्याविरोधात अर्वाच्य भाषा वापरल्याच्या आरोपावरून आज नागपूरच्या व्हरायटी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनांमध्ये पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध फलक हातात घेऊन “जयंतराव पाटील यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही”, “अश्लील भाषेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे” अशा घोषणा दिल्या.
यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष धनेश्वर पेठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, युवानेते आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या चपलांचा मार देऊन संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
पक्षाचे स्थानिक नेते दुनेश्वर पेठे म्हणाले की, “गोपीचंद पडळकर यांची भाषा लोकप्रतिनिधीला शोभणारी नाही. त्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल.”
या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यंत मान्यवर नेते असून त्यांच्या विरोधात अशा प्रकारे बोलणे हे अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे उपस्थित होते.