
मनोज जरांगेचा छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर मोठा इशारा !
मं छगन भुजबळ यांनी सध्या ओबीसी बचाव आरक्षण आणि मराठा आरक्षण जीआर रद्द करण्यासाठी रान पेटवलं आहे. ते ठिकठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करत आहेत. सरकारमध्ये राहूनही त्यांचा सरकारवर विश्वास नसल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरानिमित्त भुजबळ नागपूरमध्ये होते. येथे त्यांनी ओबीसी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. आता समता परिषदेतंर्गत ओबीसी समाजाची एकजूट दाखवण्यात येणार आहे. गरज पडली तर दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांना काय करायचं ते करुद्यात
मराठा जीआरविरोधात मंत्री भुजबळांनी मोठी भूमिका घेतली. त्यांनी न्यायालयीन आयुधासह रस्त्यावरच्या लढाईचे सूतोवाच केले. राज्य सरकारच्याच भूमिकेविरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. मराठा जीआर हा ओबीसी आरक्षणाला धक्का देणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर भुजबळांना काय करायचं ते करुद्यात, त्याची काही अडचण नाही. असे तुटक उत्तर जरांगे यांनी दिले.
तर मराठे खोलात घुसतील
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सुद्धा थेट इशारा दिला. जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसतील असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याता उत्तर देणार हे जरांगे यांनी ठणकावले.
चलो दिल्ली चा नारा
दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कूच करण्याचे सूतोवाच केले होते. ओबीसी प्रवर्गातूनच मराठा बांधवांना आरक्षणावर जरांगे ठाम आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटनुसार, राज्य सरकारने कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांच्या कुणबी नोंद करायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही मराठा बांधवांना याविषयीचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या काही याचिका कोर्टासमोर टिकल्या नाहीत. पण याप्रकरणात ओबीसी आणि मराठा समाजात कटुता आणण्याचे प्रयत्न होताना ही दिसत आहेत. त्यासाठी काही मंडळी ही मराठवाड्यात सक्रीय झाल्याचे ही दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी गावा गावातूनच एकीची हाक देणे आणि गावकी टिकवणे गरजेचे असल्याचे अनेक गावातील ज्येष्ठ मंडळींचे मत आहे.