
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शेवगावमधील स्थानिक नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्र्वर सहकारी साखर कारखान्याला राज्यातील भाजप महायुती सरकारने हमी घेत कर्ज मंजूर केलं आहे.
सुमारे 39.88 कोटी रुपयांचे कर्जाला मंजुरी देण्यात आली.
कारखान्याने राज्य बँकेकडे 100 कोटी रूपयांच्या कर्जाची मागणी केली होती. त्यात पैकी 39.88 कोटी रुपयांच्या कर्जास सरकारहमी प्राप्त झाली आहे.
भाजप(BJP)नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 26 आॅगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कर्जावर निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या 6 सप्टेंबरच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. मंजूर केलेले कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी
बँकेकडून घेण्यास संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक व सामूहिकरित्या जबाबदार राहील. संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता करून बंधपत्र सादर करण्याच्या सूचना होत्या. तशी अटच घालण्यात आली होती. यानंतर मंजूर कर्जासाठी सरकारने हमीची मान्यता दिली.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना हा शरद पवार(Sharad Pawar) यांचे स्थानिक नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. बबनराव ढाकणे हे जनता दलाचे सदस्य होते. बीडमधून त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव अॅड. प्रतापराव ढाकणे राजकारणात सक्रिय आहेत.
अॅड. प्रतापराव ढाकणे 2014पूर्वी भाजपमध्ये सक्रिय होते. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे संभाळली.परंतु तिथं तात्विक वाद झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सक्रिय झाले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर देखील ते शरद पवार यांच्याबरोबर उभे राहिले. भाजप गेली 15 वर्षे सत्तेत आहे. त्यामुळे प्रतापराव ढाकणे यांचा पक्षांतराचा निर्णय राजकीय करिअरसाठी धोक्याचा ठरल्याची चर्चा होत असते.
कर्ज मंजुरीनंतर चर्चांना उधाण
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणामुळे राज्यातील राजकीय गणितं बदलली आहे. भाजप महायुती राज्यात सत्तेत आहेत. राज्यातील सहकारावर अजूनही काँग्रेस अन् राष्ट्रवादीची छाप आहे. सहकारातील राजकारणात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये संघर्ष उफाळत असतो. अशातच शरद पवार यांच्या निष्ठावान असलेल्या अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या शेवगावमधील कारखान्याला सरकार हमीवर कर्ज मंजूर झाल्याने वेगळ्याच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
फडणवीसांबरोबर मुंबईत बैठका?
गेल्या काही दिवसांपासून अॅड. प्रतापराव ढाकणे राजकारणात उघडपणे सक्रिय नाहीत. पण कारखान्यासाठी ते मुंबईत सत्ताधाऱ्याशी संपर्कात असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ‘वर्षा’वर बैठका झाल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. या बैठकांमध्ये बरचं काही शिजल्याचं सांगितलं जातं. आता कारखान्याला कर्ज मंजूर झाल्याने या बैठकांचा इतिहास पु्न्हा चर्चेत आला आहे.
ढाकणेंची भाजपच्या कार्यक्रमांना हजेरी
शेवगावमध्ये मध्यंतरी देवाभाऊ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या व्यासपीठावर अॅड. प्रतापराव ढाकणे होते. त्यावेळी देखील ढाकणे चर्चेस्थानी आले. विशेष म्हणजे, शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांना या कार्यक्रमाला डावलण्यात आलं होते.
ढाकणेंच्या निर्णयाकडे लक्ष
मुख्यमंत्री फडणवीसांनी ढाकणेंच्या कारखान्याला दिलेले ‘अर्थ बळा’ने चर्चेला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर आहेत. त्यामुळे अॅड. प्रतापराव ढाकणे कोणता निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागलं आहे.
कर्ज मंजूर करतानाच्या अटी…
कारखान्याला कर्ज मंजूर करताना खूपच अटी घालण्यात आल्या आहेत. कर्जाचा वापर ज्या उद्दिष्टासाठी घालण्यात आला आहे, त्यासाठीच झाला पाहिजे. आवश्यक तेवढ्याच कर्जाची उचल घ्यावी. कर्जाची मुद्दल अन् व्याज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी कारखान्याची राहणार आहे. सरकार हमीवर देण्यात आलेल्या कर्जाचे दायित्व सरकारवर नसून, याबाबत सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने दक्षता घ्यावी. कारखान्याने दर महिन्याला कर्ज परतफेडीच्या प्रगतीबाबतची स्थिती दर्शविणारी माहिती सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग अन् वित्त विभागाकडे द्यावीत. कारखान्याने विहित कार्यपध्दतीने लेखा परिक्षित केलेल्या लेख्यांची एक प्रत सरकारकडे द्यावी. कारखान्याने त्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सरकार निर्णयासोबत जोडलेल्या ‘प्रपत्र-अ’मध्ये दर सहा महिन्यांनी सहकार, पणन व वस्रोद्योग विभागास सादर करण्याचे निर्देश दिले.