
संविधानात आपली लायकी काय लिहिलं आहे; पोटात मुरडा आल्यासारखे…
शिवप्रतिष्ठान संस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी देशाच्या संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपली काय लायकी आहे? असा उल्लेख त्यांनी केला आहे. सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
त्यांनी दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी भारतातील लोकांना निर्लज्ज असे संबोधून भारतीय संविधानावरही टीका केली आहे.
दांडिया आणि गणेश उत्सव यांचं विकृतीकरण करण्यात आलं-भिडे
संभाजी भिडे म्हणाले, “आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको, तर हिंदवी स्वराज्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती. त्याच प्रेरणेने आम्ही दुर्गामाता दौड घेतो. आपण गणपती व नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
संविधानाबाबत काय म्हणाले संभाजी भिडे?
संविधानाविषयी बोलताना भिडे यांनी तीव्र शब्दांचा वापर केला. ते म्हणाले, “आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. आणि लोक ते वाचतातही पोटात मुरडा आल्यासारखे. काय संविधान, कसले संविधान? भारत हा १३०० वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची, गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे,” असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं आहे.
आपला देश निर्लज्ज लोकांचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण डोक्यात, चित्तात, मनात ठेवून आपण धावत येतो. दुर्गे, अंबिके, कालिके आम्हाला स्फुरण दे की छत्रपती आमच्या चित्तातून जाणार नाही. आम्हाला नुसतं स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको, आम्हाला हिंदवी स्वराज्य हवं आहे असंही संभाजी भिडे म्हणाले. दरम्यान संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्यामुळे मूल जन्माला येत असल्याचाही अजब दावा केला होता. आंबे खाऊन मूल होतात असे मी एकदा म्हणालो होतो. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे. मी एक आंब्याचे झाड लावले आहे. तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. याविषयी माझा एक कोर्टात खटला सुरू आहे, असे ते म्हणाले होते.