
भारताला हरवायचं असेल…
पाकिस्तानी संघाने गुरुवारी आशिया चषकातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत विजय प्राप्त केला. या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानी संघाने अवघ्या 11 धावांनी निसटता विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
त्यामुळे आता येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pakistan) यांच्यात आशिया चषकासाठीचा अंतिम सामना होईल. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाला (Team India) हरवण्यासाठी पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी रणनीती आखली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी पाकच्या खेळाडूंना एक सक्त ताकीद दिली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी इतर गोष्टींवर अजिबात लक्ष देऊ नये, फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, असे हेसन यांनी आपल्या संघाला सांगितले आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ प्रथमच आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. भारत-पाकिस्तान युद्धामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवायलाही नकार दिला होता. पाकिस्तानी खेळाडूंनीही मैदानात आक्षेपार्ह हावभाव करुन भारताला डिवचले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना हायव्होल्टेज असणार आहे.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी आपल्या संघाला अंतिम सामन्यापूर्वी काही सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, माझं खेळाडूंना एकच सांगणं आहे की, त्यांनी फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, ते निश्चितपणे ही गोष्ट करतील. हायव्होल्टेज सामन्यांमध्ये नेहमीच शेरेबाजी आणि तत्सम गोष्टी घडत असतात. अंतिम सामन्यात भारतीय संघावर दडपण आणायचे असेल तर आम्हाला आमचा चांगला खेळ करावा लागेल. कारण भारतीय संघ आजघडीला जगातील अव्वल संघ आहे. त्यामुळे भारतीय संघाला वेसण कशी घालायची, हे आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळताना वेळोवेळी प्रगती केली आहे. पहिल्या सामन्यात आम्ही टीम इंडियाला पूर्णपणे वर्चस्व गाजवून दिले. गेल्या सामन्यात आम्ही बराच काळ पकड राखली होती. पण अभिषेक शर्माच्या खेळीने हा सामना आमच्या हातातून निसटला. आता आम्हाला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. त्याचा लाभ आता आम्हाला घ्यावा लागेल. आम्ही हा सामना जिंकून आशिया चषक जिंकण्यासाठी प्रयत्न करु, असे माईक हेसन यांनी सांगितले.
फायनलमध्ये टीम इंडियाला धक्का बसणार?
माईक हेसन यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मते पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना भारतीय संघासाठीही दडपण आणणारा असेल. भारतीय संघावर हा दबाव कायम ठेवण्यात यश आले तर पाकिस्तानला विजय मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी आशिया चषकातील दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला होता. तर सुपर फोरमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला सहा गडी राखून हरवले होते. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या सलग सात सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला अस्मान दाखवले आहे.