
अमेरिकेचा डाव; इराणवरील…
मागील काही दिवसांपासून इराणवर अमेरिकेचा दबाव वाढलाय. मात्र, या वाईट काळात रशिया पूर्णपणे इराणच्या बाजूने उभा आहे. हेच नाही तर इराणच्या मदतीला चीननेही हात पुढे केलाय. इराणवरील निर्बंध पुढे ढकलण्यासाठी रशिया आणि चीनने मांडलेला प्रस्ताव शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने फेटाळला आणि हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.
2015 च्या अणुकरारात नमूद केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी होण्याच्या एक दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला. इराणवरील निर्बंध लागू करण्याविरोधात रशिया आणि चीनने प्रस्ताव मांडला होता. मात्र, या प्रस्तावाला नऊ देशांचा पाठिंबा मिळू शकला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव पास होऊ शकला नाही. 2015 च्या इराण अणुकराराखालील संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध आता शनिवारपासून लागू होतील.
रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील उपराजदूत दिमित्री पॉलियान्स्की यांनी बैठकीमध्ये बोलताना म्हटले की, आम्हाला नक्कीच वाटले होते की, युरोपियन देश आणि अमेरिका याबद्दल परत एकदा विचारल करेल ते त्यांच्या अयशस्वी ब्लॅकमेलिंगऐवजी राजनयिकता आणि वाटाघाटीचा मार्ग निवडतील. मात्र, तसे होऊ शकले नाही. रशिया, चीन, पाकिस्तान आणि अल्जेरिया या चार देशांनी पुन्हा एकदा इराणला ई 3 (ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी) आणि अमेरिकेसोबत चर्चेसाठी अधिक वेळ देण्याचे आवाहन केले आहे.
निर्बंध पुन्हा लागू केल्याने इराणची परदेशात असलेली मालमत्ता पुन्हा गोठवली जाणार आहे. याव्यतिरिक्त, तेहरानसोबतचे शस्त्रास्त्र व्यवहार थांबवले जातील. फक्त हेच नाही तर इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या कोणत्याही विकासावर दंड आकारला जाईल. संयुक्त राष्ट्राकडून इराणवर अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. चीन आणि रशिया इराणच्या बाजूने उभे राहिले. मात्र, इतर देशांनी या प्रस्तावाला साथ न दिल्याने त्यांचाही नाईलाज झाला.
संयुक्त राष्ट्राच्या कारवाईमुळे अगोदरच डळमळीत आलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे.
यामुळे आता इराण आणि पाश्चात्य देशांमधील आधीच वाढलेला तणाव आणखी वाढेल अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.
अमेरिकेने राजनैतिकतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप इराणकडून केला जात आहे.