
माजी नगरसेवकाने चंद्रकांत पाटलांसमोरच…
1 ऑक्टोंबरला सांगलीत रावण दहन आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ इशारा मोर्चा आयोजित केला आहे. तत्पूर्वी या नियोजनासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत भाजपमध्येच चांगलीच चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीपूर्वी चांगलेच संतापले. माजी नगरसेवक संजय आवटी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात थेट शाब्दिक चकमक उडाली. या बैठकीला निरोप न मिळाल्याने मानापनावरून माजी नगरसेवक आवटी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.
पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने हे वातावरण आणखीनच चिघळले. सांगली जिल्ह्यातील मिरज विश्रामगृहात या संदर्भात भाजपकडून बैठकीची तयारी करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे, सदाभाऊ खोत जनसुराज्य शक्तीचे समित कदम भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासह महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून आवटी यांना भाजपच्या कोणत्याच बैठकीचा निरोप देत नसल्याचा आरोप करत संजय आवटी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. माझे वडील जेष्ठ असून सुद्धा आपण या बैठकीला बोलावले नसल्याचा संताप संजय आवटी यांनी व्यक्त करून दाखवला. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर चर्चा करू असे सांगितले.
त्यावर आवटी यांनी या प्रश्नाचे उत्तर मला आत्ताच हवे असा आग्रह धरला. ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आवटी यांना बोलावून घेतले. विधानसभा निवडणुकीत तुम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला तुम्ही अपक्षांचा प्रचार केला. तुम्हाला निमंत्रण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात? माझ्या जिल्हाध्यक्षाचा अपमान मी सहन करणार नाही अशा शब्दात सुनावले.
त्यावर सुरेश आवटे यांनी मंत्री दादांनाच कोणीतरी भडकवले आहे. आम्हाला पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण मिळत नाही. आम्ही लपून-छपून काहीच केले नाही, करणारेच दादांसोबत आहेत. मिरजेत आम्ही पक्षाचाच प्रचार केला असल्याचं आवटी यांनी स्पष्ट केले. त्यावर मंत्री पाटील यांनी आवटी यांना यापुढे सर्वांनाच निमंत्रण देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी केल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला.