
मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील बीड मधील महाएल्गार मेळावा रद्द करण्यात आला आहे. मेळावा स्थगित करण्यात आला असून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या संदर्भात स्वत: ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती 28 सप्टेंबर रोजी हा मेळावा होणार होता. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांची महाएल्गार सभा होणार होती. परंतु आता मंत्री भुजबळांनीच हा मेळावा स्थगित केल्याची माहिती दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू केलं. शासनाच्या या निर्णयाला मंत्री भुजबळांनी विरोध करत आव्हान दिलं. त्याचाच भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि विशेषत: बीड जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी व शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून त्या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती भुजबळांनी दिली आहे.
भुजबळ म्हणाले, गावागावातून अनेक कार्यकर्ते या मेळाव्याची जनजागृती गेल्या आठ दिवसांपासून करत होते. या महासभेत आपण सरकारने २ सप्टेंबरला जो जीआर काढला त्यातून कसे ओबीसींचे नुकसान होतंय, तो जीआर कसा संविधानाच्या विरोधात आहे, त्यातील शब्दरचना कशी चुकीची आहे, ओबीसींवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी आपण या मेळाव्यातून सांगणार होतो.
भुजबळ म्हणाले मी विनमप्रपणे कळवतो की, गेली दहा पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरु आहे. अनेक ठिकाणी महापूर आला आहे. शेतं, गुरं-ढोरं वाहून गेली आहेत. शेतकरी संकटात आहे. अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. बीड शहरात सुद्दा प्रचंड पाऊस पडतो आहे. आपण महासभेसाठी वॉटरप्रुप मंडपही उभारला होता. परंतु मंडपात गुडघाभर पाणी आहे अशी माहिती मला तेथील कार्यकर्ते सुभाष राऊत यांनी मला कळवले आहे. त्यामुळे सध्य स्थितीत हा महामेळावा आपण पुढे ढकलूया..पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मेळावा घेऊ अशी माहिती भुजबळांनी दिली आहे.
तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, की अतिवृष्टीमुळे जे शेतकरी अडचणी आले आहेत त्यांची मदत करा, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. शेवटी शेतकरी जगला तरच हे जग जगणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत करुया असे आवाहन भुजबळांनी समता परिषद व ओबीसी कार्यकर्त्यांना केले.