
महागाई भत्त्यात 3% वाढ; पेन्शनधारकांनाही लाभ…
सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता आणि महागाई भत्ता भत्ता यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
या निर्णयाचा फायदा देशभरातील लाखो कर्मचारी व पेन्शनधारकांना होणार आहे.
किती वाढ झाली?
सरकारच्या घोषणेनंतर (Central Government) कर्मचाऱ्यांचा DA 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू मानली जाईल. त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे थकित भत्ते कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहेत. परिणामी दिवाळीपूर्वीच (Diwali) कर्मचाऱ्यांच्या हातात वाढीव पगाराची रक्कम येणार असून सणासुदीच्या खरेदीसाठी मोठा (DA Hike) हातभार लागणार आहे.
कोणाला लाभ होणार?
हा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होईल. याशिवाय निवृत्त कर्मचारी (पेंशनर्स) व कुटुंब पेंशनधारकांनाही या वाढीचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे सक्रिय कर्मचारीच नव्हे तर पेन्शनवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा मिळेल.
वर्षातील दुसरी वाढ
दरवर्षी सरकार महागाई भत्ता सहा महिन्यांच्या अंतराने बदलत असते. यावर्षी यापूर्वी एकदा DA वाढ करण्यात आला होता. त्यामुळे 2025 मधील हा दुसरा वाढीचा निर्णय ठरत आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा, खरेदी क्षमता टिकून राहावी आणि उत्सव काळात आर्थिक चक्राला गती मिळावी, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
सणासुदीचा बोनस ठरणार
सणांच्या अगोदरच वाढलेले वेतन आणि महागाई भत्ता यामुळे दिवाळी, दसरा यावेळी कुटुंबियांच्या खर्चाला आधार मिळणार आहे. यामुळे बाजारातही खरेदीची लगबग वाढेल आणि अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा तज्ञांचा अंदाज आहे.