
OBC बैठकीपूर्वीच वादंग; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ !
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले. मराठा आंदोलक थेट मुंबईत दाखल झाल्याने राज्य सरकार अडचणीत आले. त्यात हायकोर्टाने पण धारेवर धरल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.
सरकारने मग त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पाठवले. त्यातून मराठा आरक्षणाविषयीचा शासन निर्णय,GR काढण्यात आला. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, औंध गॅझेट, कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीविषयी मार्ग काढण्यात आला. या शासन निर्णयाला अनेक ओबीसी नेत्यांनी हरकत घेतली. त्यात मंत्री छगन भुजबळ, प्रा. लक्ष्मण हाके आणि काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी या जीआरला कडाडून विरोध केला. तर वडेट्टीवार यांनी आता जरांगे पाटलांवर मोठे खापर फोडले.
मनोज जरांगेंनी आमचा सत्यानाश केला
10 ऑक्टोबर रोजी सकल ओबीसींचा नागपूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने जो जीआर काढला, तो ओबीसींच्या मुळावर घाव घालणारा असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. जरांगे पाटील यांच्याविषयी मला काय विचारताय. त्यांनी आमचा सत्यानाश केला आहे. त्यांनी आम्हाला उद्धवस्तच केले आहे. धुळे येथील एक आकडेवारी माझ्याकडे आली. त्यात 38000 दाखले देण्यात आले होते. आता कुणबी दाखले दिल्याचा आकडा 1 लाख 28 हजारांवर पोहचला आहे. याचा अर्थ समजून घ्या. काय कुठं चाललंय. त्यांनी आम्हाला मातीत घालायचं ठरवलंच आहे. आम्ही छोटे छोटे बारके समाज आहोत. आम्हाला मातीत घालून संपावायचं आहे. एकछत्री राज्य करायचं असेल तर सरकार आणि जरांगे पाटील ठरवतील असा वर्मी घाव विजय वडेट्टीवार यांनी घातला.
2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा
आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यातील 40 हून अधिक ओबीसी नेते त्यात सहभागी होतील. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची आमची मागणी आहे. बैठकीत सकारात्मक होण्याची शक्यता आहे. मुळ ओबीसीत मोठी घुसखोरी होत आहे. आरक्षणाची मर्यादा तितकीच आहे. जर लहान ओबीसीत मोठा समाज जर आला तर गरीब समाजाची वाईट अवस्था होईल. त्यांना ओबीसी आरक्षणाचा कोणताही फायदा मिळणार आहे. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. जर हा जीआर रद्द केला तर आपण 10 ऑक्टोबर रोजीचा ओबीसी मोर्चा रद्द करू. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करू असे वडेट्टीवार म्हणाले.