
रामदास कदम म्हणाले सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवल्याच्या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपावरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचा रामदास कदम आणि त्याला उत्तर देणारे ठाकरे सेनेचे अनिल परब यांच्यात आता राजकीय सामना रंगू लागला आहे.
यावरून रामदास कदम यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीत का ठेवले होते याच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार असून त्यासाठी सोमवारीच (6 ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी पत्नी आणि पुतण्याबाबत अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवरून न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात पार्थिवाबाबत पहिला आरोप केला होता. त्यानंतर त्याला ठाकरे सेनेकडून अनिल परब यांनी उत्तर दिले. यावरून रामदास कदम खवळले आहेत. माझ्या आरोपांना उद्धव ठाकरे का उत्तर देत नाही, चमच्यांना का पुढे करत आहेत, असा सवाल त्यांनी केला. तसेच पत्नी आणि पुतण्याबाबत बोलून त्यांनी बदनामी चालवली आहे. याबद्दल त्यांना न्यायालयात खेचण्याचाही इशारा दिला. पत्नीच्या 1993 च्या घटनेबाबत मी बोलायला तयार आहे. पत्नी स्टोव्हवर जेवण करत असताना साडीने पेट घेतला. मी त्यांना वाचवले. माझी पत्नी 6 महिने रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी खुद्द बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आले होते. तत्कालीन आरोग्य मंत्री येत असत. मात्र, परब यांनी माझी बदनामी चालवली आहे.
तसेच माझ्या कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केलेली नाही. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणार, असा इशाराही कदम यांनी दिला.
योगेश कदम यांनी निवडणुकीत पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडले होते. तरीही सर्वांच्या नाकावर टिच्चून योगेश निवडून आला, मंत्री झाला हे त्यांना सहन होत नाही. म्हणूनच कदम कुटुंबांचा सूड उठवण्यासाठी, योगेश कदम याचा राजीनामा घेण्यासाठी त्यांचे कायम प्रयत्न सुरू असतात, असा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला. त्याचवेळी अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. त्यांनी पत्रकार परिषदेतून माझ्यावर केलेले आरोप म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन असल्याची खिल्लीही त्यांनी उडवली. मी दसरा मेळाव्यात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बोललो होतो. आता परब त्या डॉक्टरवरही दावा करणार का, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.