
मराठा समाजाला छगन भुजबळांचा थेट इशारा !
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद टोकाला पोहोचला आहे. त्यातच आता मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतंच ओबीसींच्या बाजूने त्यांची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी हा २७४ जातींचा समावेश असलेला एक वर्ग आहे, ती जात नाही.
मराठा समाजाला EWS चे आरक्षण दिले तेव्हा ओबीसी समाजाने विरोध केला नव्हता. मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण घ्यावे, कारण ओबीसींच्या आरक्षणात आधीच मोठी गर्दी आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
छगन भुजबळ यांनी नुकतंच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मराठवाड्यात मागसवर्गीय समाज मोठा आहे. ओबीसी हा एक वर्ग आहे. ती जात नाही. त्यात २७४ जाती आहे. कोणत्या एखाद्या जातीसाठी आम्ही लढत नाही. EWS चे आरक्षण जेव्हा दिलं ते खास मराठा समाजासाठी दिलं होतं. आम्ही विरोध केलेला नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. इथे आधीच खूप जास्त गर्दी आहे. जर तुम्ही आलात तर तुमचाही फायदा होणार नाही, आमचाही होणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो
कोर्टात अनेक खोटी सर्टिफिकेट येतात. कसा धक्का लागत नाही. कुणबी समाजानेही याला विरोध केला. जर तुम्ही जास्त लोक चुकीच्या मार्गाने भरले तर कसा धक्का लागत नाही. मनोज जरांगे सातत्याने माझ्याबद्दल बोलतात. ते माझ्याबद्दल अपशब्द वापरतात. म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो. नाहीतर मला त्यांच्याबद्दल बोलण्याचे काहीही घेणंदेणं नाही. आम्ही कोणालाही शिव्या शाप देत नाही. रस्त्यावर मारामारी करत नाही. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते. आम्ही सरकारला सांगतोय की हे चुकीचं सुरु आहे हे सांगतोय, पण जर सरकार ऐकत नसेल तर मग आमच्यापुढे दुसरा पर्याय कोर्टाचा आहे. तिथे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहोत, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
आम्ही त्याच्या विरुद्ध बोललोच नसतो
मराठा समाज हा आमचा शत्रू नाही. आम्ही एकही शब्द मराठा समाजाबद्दल बोललो नाही. पण हा जो नेता उगवला आहे, तो सातत्याने आमच्यावर टीका करतोय. तो आम्हाला काही बोलला नसता तर आम्ही त्यांच्या वाटेला गेलो नसतो. आम्ही हायकोर्ट आणि कोर्टात लढत बसलो असतो. आम्ही त्याच्या विरुद्ध बोललोच नसतो. पण तो सारखं सारखं रोज रोज बोलत असतो. कधी मला कधी मुख्यमंत्र्यांना बोलेल . आता त्यादिवशी तो राहुल गांधींना बोलला. अरे कोण तू, असा खोचक सवाल छगन भुजबळांनी केला.