
कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे सर्वपक्षीय राजकीय लागेबांधे असल्याची माहिती आता हळूहळू समोर येत आहे. काल शरद पवार गटाच्या रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निलेश घायवळ याचे भाजपच्या राम शिंदे, चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांच्याशी हितसंबंध असल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर आता निलेश घायवळ याच्या मामांनी रोहित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. निलेश घायवळ याचे मोठे मामा जानकीराम गायकवाड हे जामखेडच्या सोनेगाव येथे राहातात. त्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले भाचे निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
निलेश घायवळ याला अमरावती जेलमधून काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनीच प्रयत्न केले होते. सचिन घायवळ याला निवडणुकीत उभे राहायचे होते. त्यामुळे आता रोहित पवारांकडून घायवळ बंधूंना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा जानकीराम गायकवाड यांनी केला. निलेश आणि सचिन यांचे वडील पुण्यात नोकरीला होते. त्यामुळे हे दोघेही लहानपणापासून पुण्यातच राहिले आहेत. त्यांचं बालपण आणि शिक्षणही पुण्यातच झाल्याचे जानकीराम गायकवाड यांनी सांगितले. या आरोपांवर आता रोहित पवार काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीला
निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पिस्तुलासाठी शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे अडचणीत आले होते. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. मी कुठल्याही गैरप्रकाराने शस्त्र परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नसल्याचे योगेश कदम यांनी शिंदेंना सांगितले. शस्त्र परवाना प्रकरणात नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमांना शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत आश्वस्त केले. एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन , तुम्ही चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही. विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, असे एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमांना सांगितले.