
तुझी लेकरं अन् आमचं काय बकरं; OBC महामोर्चात वडेट्टीवारांचा घणाघात…
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथील ओबीसी महामोर्चामध्ये राज्य सरकारच्या आरक्षण धोरणांवरून जोरदार हल्लाबोल केला.
सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा ‘ओबीसीच्या मानेवर सुरी चालवणारा’ असून, सरकार जरांगे पाटील यांच्यापुढे झुकले असल्याचा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका करताना ते सारखं सारखं मराठ्यांची लेकरं मराठ्यांची लेकरं म्हणतात मग आमची लेकरं ही काही बकरं आहेत का असा सवाल देखील केला.
१५ टक्के लोकांचे राजकारण
वडेट्टीवार यांनी आरक्षणाच्या गणितावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “देशात ८५ टक्के समाज (SC, ST, आणि OBC मिळून) असताना त्यांना केवळ ५२ टक्के आरक्षण मिळते, तर १५ टक्के लोकांना ४८ टक्के आरक्षण मिळते. ही शुद्ध ‘चाणक्य नीती’ आहे. तुमच्यामध्ये भांडण लावून, हे १५ टक्क्यांचे सरकार तुमचे आरक्षण रद्द करण्याची तयारी करत आहे.”
निवडणुकांपूर्वी ‘माझा डीएनए ओबीसी आहे’ असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, “ज्या ३७४ ओबीसी जातींनी तुम्हाला खुर्चीवर बसवले, त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? केवळ एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात आणि आता याच समाजावर अन्याय करण्याची हिंमत दाखवत आहात.”
विदर्भावर अन्याय
वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून प्रमाणपत्रे देण्याच्या निर्णयामुळे ओबीसींच्या नोकऱ्यांवर झालेला परिणाम स्पष्ट केला.
“ज्या रिक्रुटमेंट (भरती) होत आहेत, त्यामध्ये ओबीसी कुठेच दिसणार नाही. विदर्भामध्ये भरल्या जात असलेल्या सर्व जागा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने ओबीसी प्रमाणपत्र घेऊन मिळवल्या आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. नागपूर कॉर्पोरेशन भरतीचे उदाहरण देत ते म्हणाले, “स्थानिक एकही माणूस नोकरीवर लागत नाहीये. एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाहीये. नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत.
आमदारकी गेली खड्ड्यात
“ज्या सरकारने २ सप्टेंबरचा जीआर काढला, तो जीआर वाचल्यावर तुम्हाला कळेल की हे कुठले नाचे-सोंगे आहेत. मला आमदारकी गेली तरी चालेल. पण माझ्या ३७४ जातीवर अन्याय होत असेल, तर वडेट्टीवार मैदानात उतरणारच! सत्ता आज आहे, उद्या नाहीये; पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं, हे आमचं पहिलं काम आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. मोर्चाचा उद्देश राजकारण नसून, सरकारला ‘शुद्धीवर आणणे हा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.