
सुप्रीम कोर्टाने अशी विचारणा का केली…
सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोर याच्याविरुद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यास अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज (दि.१६) सर्वोच्च न्यायालयात दिली.
तसेच या घटनेवर सोशल मीडियावरून प्रसारित होणारी माहिती रोखावी, अशी विनंती तुषार मेहता आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे (SCBA) अध्यक्ष विकास सिंह यांनी न्यायालयास केली.
प्रकरण पुन्हा उकरून काढणे योग्य आहे का?
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांच्या खंडपीठाने विचारले की, सरन्यायाधीश (CJI) स्वतःच या घटनेबाबत मोठ्या मनाने माफ करतात, तेव्हा प्रकरण पुन्हा उकरून काढणे योग्य आहे का? सरन्यायाधीशांनी अत्यंत मोठ्या मनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही… यावरून हे सिद्ध होते की अशा घटनांचा संस्थेवर काहीही परिणाम होत नाही.” यावर SCBA अध्यक्ष विकास सिंह यांनी सांगितले की, “घटना सतत चर्चेत ठेवली जात आहे आणि सोशल मीडिया तिचा प्रचार करत आहे, त्यामुळे संस्थेची प्रतिमा धोक्यात येत आहे.”
ही एक अक्षम्य घटना : सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “ही अक्षम्य घटना होती आणि या घटनेचा विचार करण्यात सरन्यायाधीश गवई यांची महानता आणि उदारता दिसून येते. काही लोक या घटनेचे समर्थन करत सोशल मीडियावर चुकीचा प्रचार करत आहेत, हे अत्यंत चिंताजनक आहे.
हुंडा हत्या प्रकरणातील आरोपीने सांगितले, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये होतो’, सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय: न्यायमूर्ती बागचींची नाराजी
न्यायमूर्ती बागची यांनी अशा घटनांमुळे न्यायालयाचा वेळ वाया जात असल्याची खंत व्यक्त केली. “इतके लोक तासन्तास उभे राहून न्याय मिळवण्यासाठी वाट पाहतात. आपण पाच मिनिटे या विषयावर खर्च केल्या. एवढ्या वेळात तीन महत्त्वाची प्रकरणे निकाली काढता आली असती,” असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायमूर्ती संजयकांत यांनी नमूद केले की, अशा वेळी कारवाई केल्यास वादाला अधिकच हवा मिळेल. जर आपण आता कारवाई केली, तर याचे दुसरे पर्व सुरू होईल. आणि पुन्हा एक आठवडा हे प्रकरण चर्चेत राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
घटनेचे व्यावसायीकरण सुरू : न्यायमूर्ती बागची
न्यायमूर्ती बागची यांनी सूचित केले की, अनेक सोशल मीडिया खाती या घटनेचा आर्थिक फायदा घेत आहेत. “हे अकाउंट्स केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी यावर पोस्ट करत आहेत. अल्गोरिदम अशा प्रकारच्या टोकाच्या प्रतिक्रियांनाच चालना देतात.” विकास सिंह यांचा याचिकेचाही सोशल मीडियावर वापर होईल आणि त्याचंही मोनेटायझेशन केलं जाईल. म्हणून याला नैसर्गिक संपू द्या,” असा सल्ला त्यांनी दिला.
सर्वोच्च न्यायालयाने औपचारिक तक्रार दाखल केली नाही
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना बूट फेकण्याची घटना घडली. राकेश किशोर नावाच्या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. गोंधळादरम्यान, सरन्यायाधीश शांत राहिले आणि त्यांनी कामकाज सुरू ठेवले. ते म्हणाले, “अशा गोष्टींमुळे प्रभावित होणारा मी शेवटचा व्यक्ती आहे. या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.” या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने औपचारिक तक्रार दाखल केली नाही. सरन्यायाधीश गवई यांनी रजिस्ट्रीला त्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करू नये, असे सांगितले. दिल्ली पोलिसांनी राकेश किशोर यांची न्यायालयाच्या आवारात अनेक तास चौकशी केली आणि नंतर त्यांना सोडून दिले होते.
न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी केला होता घटनेचा निषेध
बूट फेकण्याच्या घटनेनंतर सरन्यायाधीश गवई म्हणाले होते की, “या घटनेने मी आणि माझे सहकारी खूप हादरले. हा आमच्यासाठी विसरलेला अध्याय आहे.” न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान हे देखील कामकाजादरम्यान उपस्थित होते. तथापि, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी तीव्र टिप्पणी केली. ते म्हणाले, यावर गेल्या काही वर्षांत, न्यायाधीश म्हणून, आम्ही अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या इतरांना योग्य वाटणार नाहीत, परंतु त्यामुळे आम्ही जे केले त्याबद्दल आमचे मत बदलत नाही.” दरम्यान, एससीबीए अध्यक्ष विकास सिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वकील राकेश किशोर यांची कृती आणि विधाने केवळ निंदनीय नाहीत तर सर्वोच्च न्यायालयाच्या वैभव कमी करणारे आहेत. ही घटना न्याय व्यवस्थेवर आघात करणारी ठरली आहे.