
‘या’ दहशतवादी नेत्यामुळेच सुरु झाले दोन्ही देशात युद्ध…
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दशकांतील सर्वात भीषण संघर्षामागे एकच चेहरा आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) चा प्रमुख नूर वली मेहसूद.
पाकिस्तानमध्ये जवळपास रोज होणारे हल्ले याच दहशतवादी नेत्याच्या आदेशावर होतात, असा पाकिस्तानचा आरोप आहे. नुकताच दोन्ही देशांदरम्यान तणावपूर्ण संघर्षविराम (ceasefire) झाला असला तरी, पाकिस्तानची मुख्य खदखद कायम आहे: मेहसूद आणि त्याचे उच्चपदस्थ साथीदार शेजारील अफगाणिस्तानात सुरक्षित आश्रय घेऊन बसले आहेत!
मेहसूद ‘जिवंत’ की ‘ठार’?
नूर वली मेहसूदला लक्ष्य केल्याची एक खळबळजनक बातमी गेल्या आठवड्यात समोर आली. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, काबुलमध्ये एका चिलखती टोयोटा लँड क्रूझरवर एअरस्ट्राइक करण्यात आला होता आणि त्यामध्ये मेहसूद असल्याची दाट शक्यता होती!
हा हल्ला अमेरिकेने 2022 मध्ये अल कायदाचा नेता, आयमन अल-जवाहिरीला लक्ष्य केल्यानंतर काबुलमधील पहिला गुप्त एअरस्ट्राइक असू शकतो. मात्र, पाकिस्तानने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारलेली नाही. विशेष म्हणजे, दहशतवादी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मेहसूद हल्ल्यातून बचावला असल्याचा दावा केला असून, लगेचच कथितरीत्या त्याचा एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
2021 नंतर वाढली ताकद!
नूर वली मेहसूद याने 2018 मध्ये टीटीपीचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर नवसंजीवनी दिली. धार्मिक अभ्यासक असलेल्या मेहसूदने त्याच्या राजकीय कौशल्याने अंतर्गत गटबाजी संपवली आणि बदललेली रणनीती आखली. पाकिस्तानी सैन्याच्या कारवायांमुळे सीमापार अफगाणिस्तानात ढकलल्या गेलेल्या या गटाला 2021 मध्ये अफगाण तालिबानने ताबा मिळवल्यानंतर मोकळे रान मिळाले. त्यांना मुक्त संचार आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा मिळाला. यामुळेच, अफगाणिस्तानला लागून असलेल्या वायव्य पाकिस्तानमध्ये हल्ल्यांची मालिका सुरू झाली.
दहशतवादाचे ‘लक्ष्य’ बदलले !
टीटीपीच्या जुन्या इतिहासात त्यांनी सामान्य नागरिक, मशीद आणि बाजारपेठांना लक्ष्य केले होते. 2014 मधील एका शाळेवरील हल्ल्यात 130 हून अधिक मुलांची निर्घृण हत्या केली गेली होती. पण, या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी जनतेत तीव्र रोष निर्माण झाल्याचे मेहसूदच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने आता केवळ सैन्य आणि पोलिसांनाच लक्ष्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर्षी एका व्हिडिओ भाषणात त्याने पाकिस्तानी सैन्याला इस्लामविरोधी ठरवले आणि ‘जनरल्सनी मागील 78 वर्षांपासून पाकिस्तानी लोकांचे अपहरण केले आहे,’ असा थेट आरोप करून सैन्याला राजकीय आव्हान दिले.
धार्मिक विद्वान ते ‘पश्तून’ अस्मितेचा नायक!
मेहसूद केवळ एक दहशतवादी नेता नाही; तो धार्मिक विचारांना राष्ट्रवादाची जोड देतो. त्याने लिहिलेल्या 700 पानी प्रबंधात टीटीपीच्या बंडाचे मूळ ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या संघर्षात असल्याचे दाखवून दिले आहे. दहशतवादाचे तज्ज्ञ अब्दुल सय्यद यांच्या मते, मेहसूद स्वतःला पश्तून (Pashtun) वंशीय समाजाचा आवाज मानतो आणि त्यांच्या हक्कांसाठी लढत असल्याचा दावा करतो. अफगाण तालिबानसारखीच सरकारी व्यवस्था पाकिस्तानात आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र, विश्लेषकांच्या मते, त्याला देशात किंवा वायव्य भागात नगण्य सार्वजनिक समर्थन आहे.
टीटीपीच्या तीन अटी
सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी मध्यस्थांमार्फत पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत टीटीपीने तीन मुख्य आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या होत्या:
1. सीमावर्ती भागात इस्लामी कायद्याची अंमलबजावणी करणे,
2. त्या भागातून सैन्याची माघार
3. टीटीपी सदस्यांना परतण्याची परवानगी.
पाकिस्तानी सरकारने या सर्व अटी फेटाळून लावल्या आहेत.