
जर युद्ध झालं तर…
अफगाणिस्तानसोबत लढाईत शेकडो सैनिक मारल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी विनाकारण भारतावर आरोप केले आहेत. अफगाणिस्ताननेभारताच्या इशाऱ्यावर पाकिस्तानवर हल्ला केला, कारण हे हल्ले अशावेळी झाले जेव्हा अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी दिल्लीत होते असा दावा शहबाज शरीफ यांनी केला आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी टू फ्रंट वॉरवर भाष्य करत भारत पुन्हा युद्ध छेडू शकतो आणि पाकिस्तान त्यासाठी तयार आहे अशी पोकळ धमकी दिली आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडच्या दिवसांत रक्तरंजित संघर्ष दिसून येत आहे. या लढाईत पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर एअर स्ट्राइक केले आहे. त्यात अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. घरे तुटली, शाळा पडल्या. काबुल, पक्तिका, खोस्त, नांगरहर, कंधार आणि इतर प्रांतात पाकिस्तानकडून २० हून अधिक ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आले. या हल्ल्यात १२ तालिबानी नागरिक मृत्युमुखी पडले तर १०० हून अधिक जखमी झालेत. १५-२० तालिबानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
सध्या दोन्ही देशात सीजफायर असले तरी तणाव कायम आहे. त्यातच शहबाज शरीफ यांनी आव्हानात्मक भाषा वापरत जर हा सीजफायर केवळ वेळ काढण्यासाठी घेतला असेल तर आम्हाला तो स्वीकार नाही असं सांगितले आहे. त्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत शहबाज यांनी भारताला ओढण्याचा प्रयत्न केला. भारताच्या इशाऱ्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारतात असताना हे हल्ले करण्यात आल्याचे शहबाज शरीफ यांनी म्हटलं. दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनी अफगाणिस्तान आणि भारत या दोघांशी एकाच वेळी युद्ध करण्याची पाकिस्तानची तयारी असल्याचा पोकळ दावा केला आहे.
एका मुलाखतीत पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याला भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो का, तुम्हाला यावर काय वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नक्कीच, हे नाकारू शकत नाही. याची शक्यता अधिक आहे. सध्या परिस्थिती तणावग्रस्त आहे. जर दोन्ही मोर्चावर युद्ध छेडले तर आम्हीही तयार आहोत. मी सार्वजनिकपणे यावर चर्चा करू शकत नाही मात्र आम्ही कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.