राज्य सरकार विविध योजना राबवत आहे, लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये एसटी बसने प्रवासाची सुविधा, यासोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक नव्या योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
यंदा महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. शेतातील उभी पिके आडवी झाली, काही ठिकाणी तर पावसाचा एवढा जबरदस्त तडाखा बसला की शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारे काही दिवसांपूर्वी मोठ्या पॅकेजी घोषणा केली होती.
या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसान भरपाई, तसेच ज्यांचं घर पावसामुळे जमीनदोस्त झालं त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवं घर, ज्यांच्या शेतातील माती वाहून गेली त्या शेतकऱ्यांना वेगळी मदत, तसेच ज्यांच्या विहिरी पावसामुळे ढासळल्या त्यांना देखील विशेष मदतीची घोषणा, अशी मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जात आहे, यासोबत सैर कृषीपंपांवर देखील मोठं अनुदान सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात मागणी केली होती, नितेश राणे यांच्या या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे ही वीज सवलत लागू करण्यात आली आहे, मच्छिमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक, तसेच मस्त्यकास्तकार यांना ही सवलत लागू असणार आहे. मस्त्य व्यवसाय प्रकल्पांनाही कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, या सवलतीमुळे मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.


