लहान भाऊ आहेत; सुदर्शन चक्र…
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व राजकीय पक्षांचे नेते मैदानात उतरले आहेत. महाआघाडीने आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित केले आहे.
यावरून जनशक्ती जनता दलाचे प्रमुख आणि लालू प्रसाद यादव याचे थोरले चिरंजीव तेज प्रताप यादव यांना प्रश्न विचारण्यात आला. यार उत्तर देताना ते म्हणाले की तेजस्वी हे धाकटे बंधू आहेत त्यामुळे मी फक्त आशीर्वादच देऊ शकतो. दरम्यान त्यांच्या प्रतिक्रियेची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
तेज प्रताप यादव हे वृ्त्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हणाले की, ‘जोपर्यंत मी तेथे होतो, तोपर्यंत मी त्यांना आशीर्वाद दिले. आता लहान भाऊ आहेत तर आशीर्वादच देऊ शकतो. सुदर्शन चक्र तर चालवू शकत नाही. मुख्यमंत्री बनणे, न बनणे हे सर्व जनतेच्या हातात आहे. जनता मुख्यमंत्री बनवते. जर जनतेला वाटलं तर मुख्यमंत्री बनतील.
तेज प्रताप यांच्या विरोधात आरजेडीचा उमेदवार
बिहार विधानसभा निवडणुकीत तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव हे दोघेही निवडणुकीच्या मैदानात आहेत. तेजस्वी यादव आरजेडीच्या तिकीटावर राघोपूर येथून निवडणूक लढवत आहेत. तर तेज प्रताप यादव जनशक्ती जनता दल पक्षाच्या तिकीटावर महुआ विधानसभा मतदारसंघात मैदानात आहेत. सध्या तेजस्वी यादव हे राघोपूरचेच आमदार आहेत, तर तेज प्रताप यादव हसनपूर मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र तेज प्रताप यादव हे २०१५ साली महुआ विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत.
विशेष बाब म्हणजे तेज प्रताप यादव यांच्या विरोधात तेजस्वी यादवने आरजेडीच्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. तेज प्रताप यादव यांच्याविरोधात मुकेश कुमार रौशन निवडणूक लढवत आहेत. रौशन हे यापूर्वीही महुआ येथून आमदार राहिलेले आहेत. २०२० मध्ये त्यानी आरजेडीच्या तिकीटार निवडणूक जिंकली होती.
दोन टप्प्यात होणार निवडणूक
बिहार विधानसभा निवडणूक ही दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.


