मोहोळ बोलायला लागताच तुफान घोषणाबाजी; नेमकं काय घडलं ?
पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात नवनवीन आरोप करत आहेत.
दरम्यान हे प्रकरण चांगलेच तापल्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेऊन जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मोहोळ यांच्यासमोरच जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मोहोळ यांना काढता पाय घ्यावा लागला.
मोहोळ यांनी घेतली जैन मुनींची भेट
मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्यांदाच जैन बोर्डिंग येथे जाऊन जैन मुनींची भेट घेतली. तिथे जैन मुनी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात चर्चा झाली आहे. यावेळी जैन समाजाच्या प्रतिनिधींनी मोहोळ यांनी बोर्डिंगचा हा व्यवहार रद्द करावा. हा व्यवहार बेकायदेशीर आहे, असा दावा करण्यात आला. तर मोहोळ यांनीदेखील मी या प्रकरणात दोषी असतो तर जैन मुनींची भेट घ्यायला आलोच नसतो असे म्हणत या प्रकरणात जैन बांधवांना योग्य न्याय दिला जाईल. पुढच्या काही दिवसांत हा प्रश्न संपलेला असेल, असे आश्वासन यांनी दिले. तसेच जैन समाजाला हवा असलेलाच निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जमीन खरेदीचा व्यवहार हादेखील मोहोळ यांनीच केला
मोहोळ माध्यमांशी बोलत असताना मात्र मागे जैन समाजाचे बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मोहोळ माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांना मध्येच अडवून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा, अशी मागणी केली. जमीन व्यवहार रद्द करण्याची घोषणा करावी. जमीन खरेदीचा व्यवहार हादेखील मोहोळ यांनीच केला आहे, असा आरोप यावेळी जैन समाजाने केला. पुढे जैन समाजाने आक्रमक होत घोषणाबाजी केली. बोर्डिंग डिल रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या. हा सर्व गोंधळ उडाल्यानंतर शेवटी मोहोळ यांनी तेथून काढता पाय घेतला.
दरम्यान, आता जैन समाज आक्रमक झाल्यानंतर पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


