म्हणाले; मुरबाडमध्ये राहणाऱ्यांनी…
राज्यातील मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्यासाठी आज (1 नोव्हेंबर) विरोधकांनी मुंबई भव्य असा मोर्चा काढला. दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक दिग्गज नेते हे ‘सत्याचा मोर्चा’ यामध्ये सहभागी झाले होते.
दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय इथवर हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्यानंतर इथे प्रमुख नेत्यांची भाषणं पार पडली. यावेळी सुरुवातीलाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांची थेट नाव घेत एकच खळबळ उडवून दिली.
कल्याण, डोंबिवली, मुरबाडमधील मतदारांनी थेट मलबार हिल मतदारसंघात दुबार मतदान केल्याचं सांगत राज ठाकरेंनी थेट दुबार मतदारांच्या लाखो याद्याच जनतेसमोर आणल्या आहेत.
राज ठाकरेंनी थेट दाखवले पुरावे, उडवून दिली खळबळ
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजवून सांगण्याचा मोर्चा आहे. या विषयावर अनेकांनी अनेकदा बोललेले आहेत.’
‘खरं तर छोटा विषय आहे हा, फार मोठा विषय नाही. आम्ही बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायेत, पवार साहेब बोलतायेत की, यामध्ये दुबार मतदार आहेत. सगळेचं जणं बोलतायेत.. एवढंच नव्हे तर भाजपचे लोकं पण बोलतायेत की, दुबार मतदार आहेत. शिंदेंची लोकं बोलतायेत, अजित पवारांची लोकं बोलतायेत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी.. मग ही निवडणूक घेण्याची घाई का करतात?’
‘साधी गोष्ट आहे.. मतदार याद्या साफ करा, मतदार याद्या साफ केल्यावर.. पारदर्शक केल्यावर मग जेव्हा निवडणुका होतील त्यानंतर यश कोणाचं, अपयश कोणाचं.. सगळ्या गोष्टी मान्य. पण सगळं लपून-छपून जे चालू आहे ते कशासाठी?’
‘बरं आज मी तुम्हाला 2-3 गोष्टीच दाखवण्यासाठी आणल्या आहेत. खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत. 4500 मतदार.. हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी.. मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात देखील मतदान केलेलं आहे. 4500 मतदार हे कल्याण-मुरबाडमध्ये राहणाऱ्या मतदारांनी यांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केलं आहे.’
‘म्हणजे या लोकांनी तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्येही मतदान केलं. यामधील मी आता फक्त तीन नावं आणली आहेत.’
1. प्रभाकर तुकाराम पाटील
2. राम महादू भोईर
3. गजानन पुंडलिक भोईर
‘ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीत त्यांनी त्या मतदारसंघात देखील मतदान केलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघात देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोकं आहे महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी वापरले गेले.’
‘आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवणार आहे. लोकं म्हणतात, पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत?’
‘मुंबई लोकसभा मतदारसंघ.. मी तुम्हाला जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवतो. 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली. तेव्हापर्यंतची यादी मी वाचून दाखवतोय.’
यामध्ये मुंबई उत्तर.. तिथे एका लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार 456 मतदार आहेत. याच्यापैकी 62370 हे दुबार आहेत.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 16 लाख 74 हजार 861 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 60231 आहेत.
मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 15 लाख 90 हजार 710 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 92983 आहेत.
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 16 लाख 81 हजार 048 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 63743 आहेत.
मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 14 लाख 37 हजार 776 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 50565 आहेत.
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 15 लाख 15 हजार 993 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 55205 आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 19 लाख 34 हजार 349 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 99673 आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 19 लाख 85 हजार 172 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 145636 आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 17 लाख 12 हजार 242 आहेत.यामध्ये दुबार मतदार हे 102002 आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघा दुबार मतदार हे 209981 आहेत.
‘लोकं म्हणतील आकडे तर बोलून दाखवलेत. पुरावा कुठे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणला आहे या सगळ्या दुबार मतदारांचा. (याद्या दाखवल्या) हे सगळे दुबार मतदार आहेत.’
म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की, महाराष्ट्रात काय प्रकारचा गोंधळ आहे. एवढे पुरावे दिल्यानंतरही हट्ट सुरू आहे की, नाही.. नाही.. जानेवारीत निवडणुका घ्या..’
‘कशा घ्या? का घ्या.. कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतलेल्या नाहीत. अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? पण जी माणसं भरलीएत आतमध्ये? त्याचं काय करायचं? त्यातच निवडणुका आटोपून घ्यायच्या आणि यश पदरी पाडायचं. याला काय निवडणुका म्हणतात? याला लोकशाही म्हणतात?’
‘एका आमदाराचा भाऊ सांगतो की, मी 20 हजार मतदार बाहेरून आणली. म्हणजे यांची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा.. एक आमदारचा भाऊ नाही.. आमदारच.. काहीही चाललंय.. नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले आहेत. कोणी तरी सुलभ शौचालयात मतदार नोंदवले. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट देशभर सुरू आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी मतदार याद्यांवरून अनेक शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला धारेवर धरलं.


