मी आणि राज एकत्र आलोय ते…
मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चाला राज्यातून अनेक ठिकाणीहून लोक आले होते, या मोर्चानंतर उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊन भाषणं केली.
या मोर्चाचं नेतृत्वही ठाकरे बंधूंनीच केलं. विशेष बाब म्हणजे या मोर्चात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसह युती करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी नेमकं काय वक्तव्य केलं आहे?
उद्धव ठाकरे सभेत म्हणाले की, मी आणि राज दोघंही भाऊ एकत्र आलो आहोत. पण आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसांसाठी. हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे. साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळवून दाखवा. हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
५ जुलैला ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आले होते
५ जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर या दोघांच्या चार महिन्यांत दहा भेटीगाठी झाल्या. या दोघांच्या युतीची घोषणा बाकी होती. मात्र आज सत्याचा मोर्चात भाषण करत असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसह एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. खासदार संजय राऊत यांनी तर पाच महापालिका एकत्र लढवण्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचं एकमत झाल्याचंही सांगितलं होतं. मात्र ठाकरे बंधूंकडून अद्याप युतीची थेट घोषणा झाली नव्हती. आज उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचं कारणच सांगितलं आणि एका अर्थाने युतीची घोषणाच केली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढतील यात काही शंका नाही.
निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाणार-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाविरोधात आम्ही मोठं पाऊल उचलणार आहोत. चोर दिसेल त्याला तिथेच फटकवा. लोकशाही मार्गाने फटकवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. अॅनाकोंडा बसला आहे. मी मागेही आवाहन केल होतं. निवडणूक जशी जवळ येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबत आहोत. येत्या काही दिवसात आपण न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळतो की नाही पाहू. आम्हाला आता न्याय पाहिजे. सर्व पुरावे दिल्यानंतर. त्या न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री आहे. नाही तर जनतेचं न्यायालय निर्णय घ्यायला तयार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


