इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दहिवली येथून देवदर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा इगतपुरी जवळील समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात अपघात झाल्याने चालकासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून एकाच कुटुंबातील २३ भाविक एमएच ४६ एएच ०७६७ या टेम्पो ट्रव्हलरने देव दर्शनासाठी आज (दि. १ नोव्हेंबर) रोजी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाने मध्यरात्री निघाले होते. प्रवासावेळी कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या बोगद्यात सकाळी ७ वाजेच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी बोगद्यातील डिव्हायडरवर चढून धडकल्याने भीषण अपघात होऊन या अपघातात चालक दत्ता ढकवळ याचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजणे, शैलेश पाटील, पोलीस हवालदार अमित भालेराव, निलेश देवराज, विनोद गोसावी, महेंद्र गवळी, दत्तात्रय गायकवाड, मेमाने, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम व्होंडे, उपनिरीक्षक संतोष गांगुर्डे, एस. बी. पवार पोलीस हवालदार योगेश जाधव, ए.सी. गावित व कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातात जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून प्रथम इगतपुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही भाविक जास्त गंभीर असल्यामुळे त्यांना एसएमबीटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सुरेश गौरू लाड (वय ६०, रा. दहीवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड) या भाविकाचा मृत्यू झाला.
तसेच नंदकुमार मोतीराम मोरे (वय ५४) आकाश सुरेश गरुड (वय २५) हे तीन जण गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर शशिकांत शंकर लाड (वय ६५, रा. हे गंभीर जखमी झाले. तर रेखा राजेश लाड, राजेश विश्वनाथ लाड (वय ५१) अशोक लक्ष्मण लाड (वय ६१) सर्व राहणार दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. चालक दत्ता ढाकवळ, प्रवासी सुरेश लाड व त्याची पत्नी, नंदकुमार मोरे, राजेश लाड, सुरेखा लाड, उमेश लाड, हर्षदा लाड, सुजीत लाड, सुजाता लाड, शशिकांत लाड, संगिता लाड, गोरख लाड, प्रतिभा लाड, अशोक लाड, विलास मालुसरे, मिरा लाड, लिला लाड, नाईकतई , शैला लाड, सविता लाड, गुलाब लाड, नानी लाड सर्व राहणार दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड असे चालकासह एकाच कुटुंबातील २३ प्रवासी शेगाव येथे देवदर्शनासाठी या टेम्पो ट्रॅव्हलरने जाण्यासाठी निघाले होते.


